Pimpri news: भोसरी, जिजामाता, आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांमध्ये महापालिका उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट

Pimpri news: भोसरी, जिजामाता, आकुर्डी, थेरगाव रुग्णालयांमध्ये महापालिका उभारणार ऑक्सिजन जनरेटर प्लांट
Pckhabar-कोरोना साथीच्या काळात देशाच्या बर्‍याच भागात लोकांना ऑक्सिजनच्या अभावामुळे आपला जीव गमावावा लागत आहे. शहरातील ऑक्सिजनच्या कमतरता व भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून   महापालिकेच्या माध्यमातून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार नव्याने उभारण्यात आलेल्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत.

सद्यस्थितीमध्ये शहरात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांची धावाधाव होत आहे. ऑक्सिजनच्या अभावामुळे राज्यात अनेक दुर्घटना घडतांना दिसून येत आहे. भविष्यामध्ये शहरात अशाप्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी वेळीच उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याअनुषंगाने महापालिकेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या भोसरी, जिजामाता, आकुर्डी याठिकाणी 960 एलपीएम व थेरगाव रुग्णालयात 1050 एलपीएम क्षमतेचे ऑक्सीजन जनरेटर प्लांट बसविण्यात येत आहेत. या चारही रुग्णालयांच्या माध्यमातून जवळपास 450 ऑक्सीजन बेड व 50 व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी हा प्लांट उपयुक्त ठरणार आहे.
ऑक्सिजन तयार करणार्‍या कंपन्यांकडे दिवसेंदिवस मोठया प्रमाणात मागणी वाढत असल्याने या कंपन्यांकडून शहरातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी विलंब होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीचा विचार करून भोसरी, जिजामाता, आकुर्डी व थेरगाव या चार ठिकाणी ऑक्सिजन जनरेटर प्लांट बसविल्यामुळे ऑक्सिजनचा कायमचा प्रश्न मिटणार  आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *