Pimpri news: रुग्णवाहिका, शववाहिका, अंत्यसंस्कार प्रकरणी लूट करणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार

Pimpri news: रुग्णवाहिका, शववाहिका, अंत्यसंस्कार प्रकरणी लूट करणार्‍यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा इशारा
Pckhabar- कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांना स्मशानभूमीत नेताना शववाहिका आणि अंत्यसंस्कार करताना रुग्णांच्या नातेवाईकांची लूट केल्यास संबंधितांवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, असा गर्भीत इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचा रोजगारही गेला आहे. अशा परिस्थितीत काही जण सामाजिक भान विसरून कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांची लुट करत आहेत.  कोणाच्या बाबतीत लुटीचा प्रकार घडत असेल तर नागरिकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी. तिथे सेवा अ‍ॅपमध्ये माहिती भरावी. त्यानंतरही तक्रार न घेतल्यास त्याची नियंत्रण कक्षाला माहिती मिळेल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, काहीजण ट्रस्ट आणि सामाजिक संस्थांच्या नावाने रुग्णवाहिका चालवत आहेत. सामाजिक उपक्रम म्हणून सुरू केलेल्या सेवेतून काहीजण रुग्णांकडून वारेमाप पैसे लुटत आहेत. पुणे जिल्ह्यात रुग्णवाहिकांसाठी दर निश्चित केले आहेत. त्याप्रमाणे पैसे घेणे संबंधितांना बंधनकारक आहे. मृतांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी महापालिकेने तीन संस्थांना जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे न घेता अंत्यसंस्कार केले जात आहेत. संबंधित संस्थांना महापालिका ठराविक रक्कम देत आहे. असे असतानाही काहीजण मृतांच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. ही बाब निंदणीय आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचा तक्रारी येत आहेत. संकटात लोकांची लुट करणार्‍यांवर खंडणी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.
नागरिकांना पोलीस ठाण्यात तसेच कोरोना परिस्थितीशी संबंधित काही समस्या आल्यास थेट संपर्क (9134424242 / 9529691966) करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
रुग्णवाहिकांसाठी दरपत्रक –
• रुग्णवाहिका प्रकार – मारुती , 25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 500 रुपये, परतीचा किलोमीटरसाठी दर – 11 रुपये, प्रति प्रतीक्षा तास – 100 रुपये
• रुग्णवाहिका प्रकार – टाटा सुमो, मेटाडोर इत्यादी सदृश कंपनीने बांधणी केलेली रुग्णवाहिका- 25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 600 रुपये, परतीचा किलोमीटरसाठी दर – 12 रुपये, प्रति प्रतीक्षा तास – 125 रुपये
• रुग्णवाहिका प्रकार – टाटा 407, स्वराज मझदा इत्यादी चॅसीसवर बांधणी केलेली रुग्णवाहिका ः 25 किलोमीटर अथवा 2 तासांसाठी दर – 900 रुपये,  परतीचा किलोमीटरसाठी दर – 13 रुपये, प्रति प्रतीक्षा तास – 150 रुपये
रुग्णवाहिका चालक-मालक यांच्यासाठी अटी आणि शर्ती – वरील भाडेदर संपूर्ण पुणे जिल्हयासाठी लागू करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *