Pimpri news: संदीप वाघेरे यांच्यातर्फे 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन
Pckhabar-कोरोनाच्या लढाईत दररोज निगेटिव्ह बातम्या कानावर पडतात. या पार्श्वभूमीवर नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वतःच्या खर्चातून महापालिकेला 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जनता, प्रशासनाच्या लढाईला त्यांनी बळ दिले आहे. ही मदत निश्चितच खूप महत्त्वाची आणि मोठी असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरसेवक वाघेरे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले.
नगरसेवक वाघेरे यांनी स्वतःच्या खर्चातून कोरोनाबाधित रुग्णांसाठी महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाकरिता 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीन दिल्या आहेत. त्याचे लोकार्पण सोमवारी झाले. खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी अध्यक्ष संतोष कुदळे, जिजामाताचे डॉ. बाळासाहेब होडगर, डॉ. रोहीत पाटील, डॉ.संगिता तिरूमणी, डॉ. करूना साबळे, स्वीकृत सदस्य कुणाल लांडगे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कुदळे उपस्थित होते.त्यावेळी महापालिका आयुक्त पाटील बोलत होते.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, इतर महापालिकेच्या तुलनेत शहरातील सोयी सुविधा खूप चांगल्या आहेत. महापालिकेकडे 450 व्हेंटिलेटर, 2500च्या वर ऑक्सिजन बेड आहेत. कालच खासगी दवाखान्याना 35 व्हेंटिलेटर बेड दिले आहेत. जम्बोत 40 बेड उपलब्ध केले जाणार आहेत. महापालिकेच्या नवीन चार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे 700 बेड उपलब्ध करणार आहोत. पुढच्या तीन महिन्यात या रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध होतील. 40 ते 45 टक्के बेड ग्रामीण भागातून आणि बाहेरून येणार्या रुग्णांसाठी बेड देतो. सर्व रुग्णांना वैद्यकीय मदत देण्याचा प्रयत्न करतो’, असेही आयुक्त पाटील यांनी सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, संदीप यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम होत आहे. या परिसरात संदीप चांगल्या प्रकारे काम करत आहेत. माजी आमदार विलास लांडे म्हणाले, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी लोकाभिमुख कार्यक्रम घेतला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात आणखी काम करण्याची आवश्यकता आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे म्हणाले, आज आपण पाहिल तर कधी नव्हे ती अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारी आणि खाजगी रुग्णालय तुडुंब भरली आहेत. गेली कित्येक दिवस या शहरात साधारणपणे 2000 ते 2800 पेक्षा अधिक रुग्ण दररोज निष्पन्न होत आहे. अनेक रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपकरण उपलब्ध होत नाहीत म्हणून पेशंटची ससेहोलपट होताना पाहून मला अतिशय दुःख झाले. दिवस-रात्र मदत करूनही परिस्थितीत सुधारणा होत असताना दिसत नाही. म्हणून मी सदविवेक बुद्धीने मला जे शक्य होईल त्या पद्धतीने मदत करीत आहे. शहरातील रुग्णांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्याचा प्रयत्न या उपकरणाच्या माध्यमातून मी करीत आहे. ज्या समाजाने मला नेतृत्व करायची संधी दिली त्यांच्या ऋणातून थोड्याफार प्रमाणात उतराई होण्यासाठी मी हा प्रयत्न करीत आहे. 50 बेड, 4 व्हेंटिलेटर आणि 2 हाई फ्लो मशीनचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या वैद्यकीय उपकरणांतून काही रुग्णांना तरी दिलासा मिळाला तरी माझे हे परीश्रम सत्कारणी लागेल असं मी समजेल.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरिष वाघेरे, राजेंद्र वाघेरे, अमित कुदळे, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे, आकाश चव्हाण, विठ्ठल जाधव, रंजना जाधव यांनी केले.










Leave a Reply