Article By Dr. Ankush jadhav : कोरोना,लक्षणे व मानसिक स्थिती!

Article By Dr. Ankush jadhav : कोरोना,लक्षणे व मानसिक स्थिती!

Pckhabar-मित्रानो,
कोरोना पहिली लाट सप्टेंबर २० नंतर कमी होत गेली. आता कोरोना संपला या आनंदात असतानाच पुन्हा कोरोना  दुसरी लाट आली. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा भयानक आहे. या लाटेमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा कितीतरी अधिक आहे. ही लाट संपूर्ण भारतभर  मोठ्या प्रमाणात पसरली आहे. गेली ३/४ दिवस संपूर्ण भारतात ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. गुरुवार २२एप्रिल रोजी रुग्णविस्फोट झाला. त्यादिवशी  ३,१४,८३५ नवे रुग्ण आढळून आले. हा दैनंदिन रुग्ण वाढीचा जागतिक उच्चांक आहे. आता तर दरदिवशी उच्चांक होत आहे.रविवार दि.२५ एप्रिल रोजी जवळजवळ ३.५० लाख रुग्ण आढळून आले.
महाराष्ट्रात ही गेला आठवडाभर ६० ते ७०हजार दरम्यान रुग्ण आढळून येताहेत. हे सर्व आकडे पाहिल्यानंतर व जवळचे कोणी बधीत झाल्याचे ऐकल्यानंतर मनात आपोआपच भीती निर्माण होते. हा मानवी स्वभाव आहे.
“आता मलाही कोरोना होणार?”घरात कोणाला कोरोना झाल्यास काय?बेड कसा उपलब्ध होणार? तो उपलब्ध होण्यात येणाऱ्या अडचणी ? पैशाची तरतूद कशी करायची ? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात व आधीच असलेल्या ताण तणावात भर पडते. मनात नैराश्य निर्माण होते. मनात नैराश्य,
भीती, चिंता निर्माण झाल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि एकदा रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की, कोरोनासहित अनेक रोग होण्याची शक्यता असते.

ताप येणे, कोरडा खोकला,
दम लागणे, वास व चव जाणे याशिवाय जुलाब होणे, डोकेदुखी,
अंगदुखी, जीभ, तोंड कोरडे
पडणे ही लक्षणे यात दिसून येतात. ही लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांचा सल्ला घ्या. RT PCR चाचणी करून घ्या. या चाचणीचा रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा येईल. परंतु तो पर्यंत  दिवसातून ३/४वेळा तापमापकाने ताप मोजा व ऑक्सिमिटर ने ऑक्सिजन ची पातळी मोजा. त्याचा चार्ट तयार करा. ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यापेक्षा कमी होत असेल तर पोटावर झोपा पुन्हा ऑक्सिजन ची पातळी मोजा. ऑक्सिजन पातळी ९० ते ९३ टक्के असल्यास जरा कमी, ९०टक्के पेक्षा कमी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चाचणी सकारात्मक असून कोणतीही लक्षणे नसतील तर घाबरू नका. फार पॅनिक होऊ नका. दुसऱ्याला संसर्ग होऊ नये म्हणून वेगळे रहा. लक्षणे असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करा. HRCT(chest) CT स्कॅन स्कोर ८ पेक्षा कमी असणे सौम्य वा साधारण, ९ ते १५ असणे मध्यम व या पेक्षा जास्त असल्यास गंभीर समजावे.
कोरोना ची साखळी साधारण १४ ते २१ दिवसाची असते.

सर्वात प्रथम घाबरू नका. कोरोना झाला म्हणजे मृत्यू हे डोक्यातून काढून टाका. कोरोना ने फक्त २ टक्केपेक्षा कमी लोकांचा मृत्यू होतो. यातही  मधुमेह, रक्तदाब इ. आजार ज्यांना पूर्वीपासून आहेत त्यांचे प्रमाण ज्यास्त म्हणजे ७३ ते७५ टक्के आहे. दुसरे  कारण म्हणजे कोरोना झाल्याच्या भीतीने च लोक जास्त मरतात. असे दिसून आले आहे. रेमडेसिविर या इंजेक्शनसाठी लोक वणवण फिरतात. कोणत्याही किमतीला विकत घेतात. सर्व तज्ञ डॉक्टरांनी हे इंजेक्शन म्हणजे सर्व काही नाही,याने फक्त रुग्णालयातील २/३ दिवस कमी होतात, असे सांगितले आहे.परंतु वस्तुस्थिती ही आहे की, हॉस्पिटलचे डॉक्टर लिहितात म्हणून रुग्णाचे नातेवाईक धावपळ करतात. डॉक्टरांनी फक्त आवश्यक असेल तरच ते लिहून द्यावे.

या दुसऱ्या लाटेत वाढू लागलेली रुग्ण संख्येने लोकांत भय व नकारात्मकता वाढू लागली आहे. हे दूर करण्यासाठी समाजमाध्यमे व टी. व्ही.यातून देण्यात येणाऱ्या कोरोना विषयक बातम्या पाहू नका. अफवांवर विश्वास ठेवू नका.७/८तास शांत झोप घ्या. वादविवाद टाळा. घरचे खा. याने मनाची व शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.

जो पर्यंत आपल्यापर्यंत विषाणू येत  नाही तो पर्यंत त्याचे गांभीर्य समजत नाही.तो पर्यंत आपण फारच त्याला सहजतेने घेत असतो. असे करू नका.
कोरोना चा विषाणू जात,
धर्म, गरीब, श्रीमंत, साधू, संन्याशी,
देवभक्त, मौलवी, पाद्री काही जाणत नाही. तो कोणालाही हाऊ शकतो. तो खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव मानणारा आहे.
राजकारणी लोकांचा सत्तेसाठी राजकारण करणे, हा धंदा आहे. ते तो सोडणार नाहीत परंतु तुम्ही यात पडून गाफील राहू नका. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ही इशारा देण्यात आला आहे.
स्वतःची, कुटुंबाची काळजी घ्या. वारंवार हात धुणे, योग्य प्रकारे मास्क चा वापर करणे, दोघांच्या मधील योग्य अंतर राखणे, गर्दीत न जाणे या सारख्या सामान्य प्रतिबंधक उपायांचा काटेकोरपने पालन करून आपले या अदृश्य विषाणू पासून रक्षण करा.

व्हाट्सएपवरील उपाय करू
नका किंवा ते कोणाला फॉरवर्ड ही करू नका. त्याने न कळत नुकसानच होते. शक्य असेल तेवढी एकमेकांना मदत करा. वाघासारखे फिरू नका. जंगलात जेव्हा वणवा पेटतो, तेव्हा वाघासाहित सर्वच प्राणी सैरावैरा धावतात. पण वणवा कोणालाच सोडत नाही. यावेळी एकच प्राणी हुशारी दाखवतो तो म्हणजे उंदीर. वनवा पेटताच तो जमिनीतील बिळात जाऊन लपतो व जीव वाचवतो. सध्या आपणास ही उंदीर होण्याची गरज आहे.
लक्षात ठेवा
रोग झाल्यावर तो बरा करण्यापेक्षा रोग होऊच न देणे चांगले

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *