Article By Dr. Ankush jadhav : स्वस्त, मस्त व आरोग्यदायी- शेवगा
Pckhabar-“शेंगांमध्ये शेंग, शेवग्याची शेंग। लोणी, दूध तुपावानी, सत्व तिच्या संग” या आरोग्य म्हणीतूनच शेवग्याचे महत्त्व स्पष्ट होते. शेवग्याला संस्कृत मध्ये अनेक पर्यायी नावे आहेत. शिग्रु-तीक्ष्ण गुण असणारा, मोचक-रोगांपासून मुक्त करणारा इ.इंग्लिशमध्ये याला ड्रम स्टिक प्लांट वा हॉर्स राडीश ट्री म्हणतात कारण याच्या शेंगा ड्रम वाजविण्याच्या काठयांसारख्या असतात. शेवगा भारत व पाकिस्तान मध्ये प्रामुख्याने होतो. शेवग्याचे सारे झाडच औषधी आहे. गेल्याच महिन्यात भारतातून दोन टन शेवग्याची पावडर अमेरिकेला निर्यात झाली.
आयुर्वेदानुसार शेवगा कडू, तिखट, मधुर व लवण (खारट) रसाचा आहे. याचा उपयोग सूज व वेदना कमी करण्यासाठी, हृदय विकार, भूक न लागणे, जंत नाशक म्हणून होतो. याचे महत्त्व जाणूनच दक्षिण भारतात जवळ जवळ प्रत्येक घराजवळ शेवगा असतो. अन्नाच्या दृष्टीने विचार करता शेवग्याच्या शेंगेत व पानात अक्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस व “क”जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
१००ग्राम शेवग्याच्या शेंगेत-
पाणी-८६.९%, प्रथिने-२.५%, मेद-०.१%, खनिजे-२.०%, कॅल्शियम-३०मि. ग्रा.,फॉस्फरस-११०मि. ग्रा., लोह-५.३मि. ग्रा.,”क” जीवनसत्त्व-१२०मि. ग्रा., तंतुमय पदार्थ-४.८%, पिष्टमय पदार्थ-३.७% तर बी. कॉम्लेक्स किंचित प्रमाणात असते. कॅलरी -२६ आहे. पानांत कॅल्शियम, प्रथिने, लोह,”क” जीवनसत्त्व अधिक प्रमाणात असतात. सर्व भाज्यांमध्ये शेवग्याच्या पानांत “क” जीवनसत्त्व अधिक आहे.
शेंगांचे पिठले, सांबार, भाजी,
कढी करतात. थालीपीठ तयार करताना फुले व पानांचा वापर करतात. दमा, क्षय, धाप लागणे यात पानांचे सूप उपयोगी पडते. घसा, छाती, त्वचा यांच्या आजारांवर पाने, फुले, शेंगा यांचे सूप घ्यावे. यात जंतुनाशक गुण आहेत.
पचनाचे विकार असल्यास पानांचा एक चमचा रस मध व शहाळ्याचे पेलाभर पाणी यात मिसळून द्यावा. मूत्रमार्गाच्या विकारांवर पेलाभर काकडी वा गाजराच्या रसात चमचाभर पानांचा रस मिसळून घेतल्यास जननमार्गाची जळजळ,थेंब थेंब लघवीला होणे कमी होते. पाने मुलांसाठी विशेष शक्तीदायक आहेत. दुधात पानांचा रस गाळून घालून दिल्यास हाडे मजबूत होतात. ज्यांची भूक कमी झाली आहे त्यांनी याची भाजी खावी. जखमा बऱ्या करण्यासाठी याची भाजी व शेंगा खाव्यात. जखमा धुण्यासाठी साली चा उपयोग करुन सालीचाच लेप त्यावर करावा. हृदय, यकृत , प्लीहा यांची क्रिया मंदावल्यास सालीचा काढा द्यावा. याने या अवयवांची क्रिया सुधारते. तापात याचा काढा दिल्यास घाम येऊन ताप उतरतो. बोलण्यास जड जाणे, तोंडाचा अर्धांगवायू, अर्धांगवायू यात शेवगा खावा. अति प्रमाणात याचा उपयोग केल्यास काही वेळा अंगाची आग, रक्तदुष्टी होण्याची शक्यता असते.
औषध म्हणून उपयोग करताना
सालीचा रस १ ते २ चमचे, काढा १०ते १५मि. ली.,पानांचा रस ३० ते४० मि. ली., बियांचे चूर्ण १ ग्राम. या प्रमाणात घ्यावे.
“भाज्यांचे एकच महत्त्व, स्वस्तात मिळेल भरपूर सत्व.” भाज्यात ही शेवगा सर्वच दृष्टीने उपयोगी. याचा उपयोग करा व आरोग्य कायम राखा.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)










Leave a Reply