Pimpri crime news: ‘रेमडेसिवीर’चा काळा बाजार; रूग्णालयात ब्रदर म्हणून काम करणाऱ्या चौघांना अटक
Pckhabar-कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांना दोन इंजेक्शन दिले असताना सहा इंजेक्शन दिल्याचे दाखवून इतर रेमडेसिवीर इंजेक्शन जास्त दराने विकत काळा बाजार करणार्या विविध रूग्णालयात ब्रदर म्हणून काम करणार्या चौघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 74 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. चार आरोपींनी तब्बल 40 इंजेक्शनची विक्री केल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने शनिवारी सांगवी येथे केली.
बाणेर येथील कोविड सेंटरमध्ये काम करणारा मुरलीधर सुभाष मारूटकर, सांगवीतील इंदिरा गांधी रूग्णालयात काम करणारा आदित्य दिगंबर मैदर्गी, तळेगाव दाभाडे येथील मायमर रूग्णालयातील प्रताप सुनिल जाधवर (वय-24, रा. तळेगाव दाभाडे), औंध येथील मेडीपाँईट रूग्णालयातील अजय गुरूदेव मोराळे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मारूटकर हा मुख्य आरोपी आहे.
याबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी माहिती दिली. कोरोनाबाधित रूग्णांसाठी महत्वाचे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन काही जण काळ्याबाजारात जास्त दराने विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी आणि सामाजिक सुरक्षा पथकाच्या पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहकामार्फत आरोपी आदित्य मैदर्गी याच्या मोबाईलवर संपर्क साधला. त्याने दोन इंजेक्शन उपलब्ध असल्याचे सांगून एकाची 11 हजार रूपये तर दोन्हीचे 22 हजार रूपये होतील म्हणून सांगितले. आरोपीला सांगवीत बोलावून घेत ताब्यात घेऊन अटक केली. त्याने जाधवर याच्याकडून इंजेक्शन विकत घेतल्याचे सांगितले. जाधवरने मोराळेकडून इंजेक्शन घेतले होते. या तिघांना मुख्य आरोपी मुरलीधर मारूटकर याने इंजेक्शन विकले होते. मारूटकरने बाणेर येथील कोविड सेंटरमधून इंजेक्शन बाहेर विक्री केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
आरोपी हे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रूग्णांना दोन इंजेक्शन दिले असताना सहा इंजेक्शन दिल्याचे दाखवत होते. तसेच कोरोनाबाधित रूग्णांचे नातेवाईक शोधून रेमडेसिवीर इंजेक्शन 11 हजार आणि 15 हजार रूपयांना विकत होते. चार आरोपींनी तब्बल 40 इंजेक्शनची विक्री केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपींकडून 3 इंजेक्शन, 10 हजार 400 रूपयांची रोकड, एक दुचाकी, 4 मोबाईल फोन असा 1 लाख 74 हजार 400 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असताना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले, कोरोना रूग्णांसाठी महत्वाचे असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काही जण या महामारीचा गैरफायदा घेत आहेत. मात्र, रूग्णालय प्रशासनाने यामध्ये लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच काळ्या बाजारामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचीही चौकशी करण्यात येईल.







Leave a Reply