तळेगावात सार्वजनिक उत्सवाची नियमावली

 पीसी खबर -तळेगाव स्टेशन भागातील 30 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व दहीहंडी मंडळाच्या प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीमध्ये गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांकडून साजरे करण्यात येणारे सार्वजनिक सण याची नियमावली करण्यात आली.
तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान महाराज मंदिरात सोमवारी ही बैठक पार पडली. या बैठकीमध्ये गणेशोत्सवाची आचारसंहिता जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे दहीहंडी  उत्सवासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किशोर आवारे, नगरसेवक गणेश खांडगे, निखील भगत, संतोष शिंदे, सुनिल पवार, कल्पेश भगत, सुनिल कारंडे, स्टेशन भागातील रहिवासी, सोसायटीमधील पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
तळेगाव स्टेशन भागात कुठल्याही प्रकारचा दहीहंडी उत्सव साजरा करण्यात येणार नाही. गणेशोत्सवातील मंडप साईज 10 बाय 15 फुटाची राहील. मंडळाचे मंदिर, समाज मंदिर किंवा बुद्ध विहार उपलब्ध असेल तर त्यांनी मंडप न उभारता त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करावी. मान्यवरांना निमंत्रित न करता मंडळाच्या पदाधिकार्‍यांना किंवा उपस्थित नागरीकामधून आरतीचा मान द्यावा. गणेश मुर्ती तीन ते चार फुटांपर्यंत उंच घ्यावी. गणेशोत्सव काळातील आगमन सोहळा व विसर्जन मिरवणूक सोहळा रद्द करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांकडून व व्यापार्‍यांकडून वर्गणी गोळा करू नये, अशा प्रकारची नियमावली करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन सुनील कारंडे यांनी केले. कल्पेश भगत यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *