Pimpri News: गहुंजे येथील क्रिकेट बेटिंगची आंतरराष्ट्रीय लिंक: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

Pimpri News: गहुंजे येथील क्रिकेट बेटिंगची आंतरराष्ट्रीय लिंक: पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश
Pckhabar- गहुंजे येथे 26 मार्च रोजी झालेल्या भारत- इंग्लंड क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन बेटिंग घेणार्‍या 33 जणांच्या टोळीचे नेटवर्क आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु असून आतापर्यंत या प्रकरणात 37 जणांना अटक केली आहे. तसेच आणखी 25 आरोपी निष्पन्न झाले असून त्यांच्या मागावर पोलीस आहेत.
चेतन जगदीश डावर (वय 27, रा. नागपूर), बिपीनकुमार मणिलाल तन्ना (वय 52), राहुल अजय साखला (वय 27, दोघे रा. अंधेरी वेस्ट, मुंबई), अजय वसंत शहा (वय 44, रा. गोरेगाव वेस्ट, मुंबई) या चार जणांना 29 मार्च रोजी अटक केली आहे. तर, कार्तिक चावला (वय 28, रा. नवी दिल्ली), गोविंद मणिहार (वय 31, रा. नागपूर), गौरव वाघवा (वय 30, रा. हरियाणा), रेमंड कयादो (वय 21, रा. गोवा), अमित सुभाष चौधरी (वय 25, रा. इंदोर, मध्यप्रदेश) यांच्यासह 33 जणांना पोलिसांनी 27 मार्च रोजी अटक केली आहे.
26 मार्च रोजी झालेल्या भारत- इंग्लंड यांच्यात क्रिकेट सामन्यावर ऑनलाईन माध्यमातून बेटिंग घेणार्‍या 33 जणांना वाकड पोलिसांनी तीन ठिकाणी
छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून 45 लाख 37 हजार रुपयांचे 75 मोबाईल, तीन लॅपटॉप, अत्याधुनिक कॅमेरे, दुर्बिणी, रोकड असा मुद्देमाल जप्त केला. प्रत्यक्ष क्रिकेट सामना आणि त्याचे प्रक्षेपण यामध्ये काही वेळेचे अंतर असते. या वेळेचा गैरफायदा घेऊन आरोपी त्यांच्या वेगवेगळ्या अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून त्याद्वारे बेटिंग घेत होते. बेटिंग अ‍ॅप्लिकेशन तयार करणारे आणि त्यावर बेटिंग घेणारे यांचा एक गट असतो. या प्रकरणात एकूण 13 अ‍ॅप वापरले गेले. त्यापैकी एका अ‍ॅपचा मालक बिपीनकुमार तन्ना आणि एका डेव्हलपरला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच मुंबई आणि नागपूर येथील दोन मुख्य बुकींनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे नागपूर, मुंबई, दिल्ली, हरियाणा, जयपूर, गोवा या
शहरातील बूकिंपर्यंत पोहोचले आहेत. देशभरातील अन्य महत्वाच्या शहरातील बुकींची देखील नावे तपासात समोर आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय पातळीवरील बुकींशी असण्याची शक्यता कृष्ण प्रकाश यांनी वर्तवली. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, सहायक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, उमेश लोंढे, हरीश माने, फौजदार नंदकुमार कदम यांच्या पथकाने केली.

सहा आरोपींना कोरोनाची लागण

बेटींग प्रकरणात पोलीसांनी अटक केलेल्या 33 आरोपींपैकी सहा जणांना

वैद्यकीय तपासणीत कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कारवाई केलेले पोलीस अधिकारी, कर्मचारी धास्तावले आहेत. या आरोपींच्या संपर्कात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. तसेच आपण स्वत:ही कोरोना चाचणी करणार आहे, असे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *