Pune Cricket News: भारत- इंग्लंड क्रिकेट सामन्यावर सट्टा; 33 जण ताब्यात, 35 लाखांचा ऐवज जप्त
Pckhabar- गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत- इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावणा-या विविध राज्यांतील 33 जणांना तीन ठिकाणांहून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळून तब्बल 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री कारवाई करण्यात आली.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गहुंजे येथील एमसीए मैदानावर भारत – इंग्लंड संघाच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यावर सट्टा लावणा-या विविध राज्यांतील 33 जणांना ताब्यात घेतले आहे. वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या नेतृत्वाखाली तीन टिम तयार करण्यात आल्या. तिन्ही टिमनी हाय राईज बिल्डिंग, एमसीए मैदानाजवळील डोंगरावर तसेच, पुण्यातील लेमन ट्री हॉटेलवर छापा मारुन 33 जणांना ताब्यात घेतले.
अटक आरोपींमध्ये मध्यप्रदेश मधील 5, हरियाणा 13, राजस्थान 2, महाराष्ट्र 11, उत्तर प्रदेश 1 आणि गोव्यातील एकजण आहे. त्यांच्या जवळून 74 मोबाईल, 3 लॅपटॉप, 1 टॅब, 8 कॅमेरे, 4 दुर्बीण एक स्पीकर आणि चार एन्डेव्हर कार असा एकूण 35 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 1 लाख 26 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. ज्यामध्ये डॉलर, दिराम, पॉन्ड या विदेशी चलनाचा समावेश आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले, आरोपींनी पोलिसांवर हल्ला देखील केला. पण, पोलिसांनी हल्ला परतवून लावत त्यांना ताब्यात घेतले. झिरो टॉलरन्स पॉलिसी अंतर्गत शहरात कोणतीही अवैध गोष्ट खपवून घेतली जाणार नाही. अशी कोणतीही घटना निदर्शनास आली तर त्यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा कृष्णप्रकाश यांनी दिला.










Leave a Reply