Pimpri news: सायबर हल्ला प्रकऱणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस

Pimpri news: सायबर हल्ला प्रकऱणी टेक महिंद्रा कंपनीला नोटीस
Pckhabar-पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर रॅन्समवेअर हल्ला प्रकऱणात नेमकी वस्तुस्थिती काय आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करावा, अशा आशयाची एक नोटीस महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारण अधिकारी राजेश पाटील यांनी टेक महिंद्रा लिमिटेड कंपनीला  दिली आहे.
जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी या प्रकऱणात कारवाईची मागणी करत सतत पाठपुरावा केला आणि सखोल चौकशीची मागणी केली. पाठोपाठ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आदी राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही या विषयावर पत्र दिले. आयुक्त राजेश पाटील यांनी त्याची तत्काळ दखल घेत टेक महिंद्रा कंपनीला नोटीस दिली.
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कंपनीला दिलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे की, या घटनेचे मूळ कारण काय ते स्पष्ट करावे. कंपनीचे काय निरीक्षण आहे ते मुद्देसूद द्या. आगामी काळात याचे काय परिणाम होणार त्याचा तपशिल द्यावा. पुन्हा सर्व परिस्थिती पर्वपदावर कशी येणार ते कळवा. स्मार्ट सिटी प्रकल्प अंमलबजावणी किती विलंब होणार त्याचा खुलासा करावा. आगामी काळात पुन्हा असा सायबर हल्ला झाला तर कोणती खबरदारी घेतली आहे आणि या पुढे काय करणार आहात याचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. तसेच या सायबर हल्ल्याच्या आड पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याच बनाव करुन विमा लाटण्याचा डाव आखल्याची शंका नगरसेविका सिमा सावळे यांनी व्यक्त केली होती. या मुद्दयाची दखल घेत आयुक्त राजेश पाटील यांनी या घटनेत नेमके आर्थिक नुकसान कोणते, किती व कसे याचा तपशिल टेक महिंद्रा कंपनीकडून मागविला आहे.
टेक महिंद्रा कंपनी आणि त्यांच्या भागीदार कंपन्या (क्रिस्टल इंटिग्रेटीड
सर्व्हिस प्रा. लि. आणि आर्सेस इन्फोटेक प्रा.लि.) यांनी पाच वर्षाच्या काळात स्मार्ट सिटी प्रकल्पाची अंमलबजावणी आणि ऑपरेशन ची जबाबदारी घेतली आहे. करारातील अटीशर्थी त्यांच्यावर बंधनकारक आहेत. प्रत्यक्षात सायबर हल्ल्यात या अटीशर्थींचा भंग झाल्याचे सिध्द झाले आहे, अशीही तंबी आयुक्त राजेश पाटील यांनी दिली आहे.