Maval news: युवा नेते पार्थ पवार यांची फलकबाजी घेतेय लक्षवेधून!
वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा मतदार संघात जोरदार फलकबाजी
Pckhabar-राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तीन वर्षांनी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे पार्थ पवार यांना आत्तापासूनच प्रोजेक्ट करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.
पार्थ पवार यांचा उद्या 21 मार्च रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण मावळ लोकसभा मतदार संघात त्यांना शुभेच्छा देणारे मोठ-मोठे जाहिरात फलक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी निवडणूक लढविली. मात्र, राजकारणात नवख्या असलेल्या पार्थ पवार यांचा शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे निभाव लागला नाही. या निवडणुकीत पार्थ यांचा दारूण पराभव झाला. असे असले तरी पार्थ यांनी पाच लाखांपेक्षा अधिक मते घेतली होती. त्यामुळे त्यांना पडलेल्या मतदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. तसेच पार्थ यांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक मते पडली होती. पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदलूणही मुलाचा दारूण पराभव झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी खंत व्यक्त केली होती. त्यानंतर अजितदादांचे पिंपरी-चिंचवड शहराकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाल्याचे देखील बोलले जात होते.
2019 मध्येच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात वेगळी समीकरणे उदयास आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचे राज्यात सरकार स्थापन झाले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड शहराकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही प्रमाणात लक्ष देण्यास सुरूवात केली. तर आगामी पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणुक डोळ्यासमोर ठेवून पार्थ पवार यांनी गुप्तपणे कार्यकर्त्यांच्या बैठका, चर्चा सुरू ठेवली आहे. राज्य सरकारच्या संबंधित शहरातील प्रश्न सोडविण्यासाठी पार्थ पवार यांनी लक्ष घातले आहे. शहरातील स्थानिक नेतेही आपले प्रश्न घेऊन पार्थ पवार यांच्या दरबारी जात आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पार्थ पवार आत्तापासूनच नगरसेवकांना प्रभाग कशा पध्दतीने करायचा आहे? कोणत्या भागात पक्षाला अधिक काम करावे लागेल? अशी विचारणा करत आहेत. ज्येष्ठ नेत्यांऐवजी जास्तीत-जास्त तरूणांना संधी देण्याचीही त्यांची भूमिका आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यानंतर प्रथमच पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मावळ लोकसभा मतदार संघात मोठ्या प्रमाणात जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे तीन वर्षांनी होणार्या लोकसभा निवडणुकीसाठी मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीतर्फे पार्थ पवार यांना आत्तापासूनच प्रोजेक्ट करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वतुर्ळात रंगली आहे.










Leave a Reply