Article By Dr. Ankush jadhav : कोरोना-परतला का ?

Article By Dr. Ankush jadhav : कोरोना-परतला का ?
Pckhabar-अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन नुकतेच म्हणाले की, अमेरिकेत गुरुवार (११मार्च२०२१) पर्यंत कोरोना बळींची संख्या ५ लाख २७ हजार झाली. ही संख्या पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध व व्हिएतनाम युद्ध तसेच ९/११चा हल्ला या सर्वांमधील एकूण प्राणहानी पेक्षा मोठी आहे. किती भयाण? जगातील एक अत्यंत बलाढ्य देश कोरोना महासाथी पुढे अगतिक झाला. सर्वात जास्त चांगले खाणारे, सर्वात जास्त चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणारे हे राष्ट्र. आता या रोगप्रतिकारक शक्ती पुढे ही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. अमेरिकेच्या तुलनेने भारताची सर्वच बाबतीत कमी हानी झाली आहे. आतापर्यंत १लाख ५८ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या वर्षीच्या ११ मार्च २०२०रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-१९ ही कोरोना संसर्गाची जागतिक महासाथ
(pandemic) असल्याचे घोषित केले होते.

२०२० मध्ये भारताने लॉकडाऊन सारखी भयाण स्थिती अनुभवली. साथ संपत आली असे वाटत असतानाच पुन्हा भारतासहित जगभर कोरोनाची साथ पसरू लागली आहे. दिवसेंदिवस रुग्णाची संख्या वाढतच चालली आहे. गेल्या ८३ /८४ दिवसात १३मार्च रोजी सर्वाधिक म्हणजे २४, ८८२रुग्ण आढळले तर १४ मार्च रोजी २५,३२०रुग्ण आढळून आले. भारतात गेल्या ७ दिवसात कोरोनाचे रुग्ण ६७ टक्क्यांनी वाढले.
महाराष्ट्रात १० मार्चला १० हजार पेक्षा, १३ मार्च ला १५ हजारपेक्षा अधिक तर १४ मार्चला १६ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले. राज्यात कोरोना चाचण्याचे प्रमाण ही वाढले असून ते दिवसाला सरासरी ९० हजार चाचण्या इतके होत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना बधितांचे प्रमाण १० टक्के होते .ते मार्च च्या दुसऱ्या आठवड्यात १३ ते१५ टक्के पर्यंत पोहचले आहे. रुग्ण आलेख वाढत चालला आहे. वाढत चाललेल्या या रुग्ण संख्येने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण होत आहे. काही लोक पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने ग्रासले आहेत. महाराष्ट्रात अकोला, बुलढाणा, वर्धा, अमरावती, बीड, नागपूर, पुणे, ठाणे, मुंबई येथील स्थिती गंभीर बनत चालली आहे. नागपूर मध्ये लॉक डाऊन सुरू झाला आहे. काही ठिकाणी संचारबंदी सुरू करण्यात आली आहे. या वेळची साथ तुलनात्मक दृष्ट्या सौम्य असली तरी लवकर संसर्ग होणारी आहे. विषाणू चे स्वरूप वारंवार बदलत आहे. विषाणूंच्या म्युटेशन्स आढळू लागलेले नवनवे व्हेरिएन्ट्स हे जगापुढे एक मोठे आव्हान आहे. यामुळे जगासमोर ची चिंता वाढत चालली आहे.

गेली चार महिने सर्व व्यवस्थित चालले होते. भारतासहित सर्व जगभरच साथ संपली असतांना च राजकारणी,
समाजसेवक, सर्व सामान्य लोक या सर्वानीच कोरोनाच्या नियमांकडे, प्रतिबंधक उपायांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. सर्वच पक्षाच्या राजकारण्यांनी मोठ मोठे लग्न समारंभ, मिरवणुका,निवडणुका उत्साहाने , गर्दी करून लढविल्या. विरोधी पक्षांनी मंदिरे उघडण्यासाठी, लोकल गाड्या सुरू करण्यासाठी आंदोलने सुरू केली. पुढे याचे काय परिणाम होतील याचा विचार ही केला नाही. या आंदोलनात , लग्न संभारंभात, निवडणूकीतील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, धार्मिक कार्यक्रमात ना कोणी मास्क वापरला, ना कोणत्याही नियमाचे पालन केले. काहीही होऊ दे आम्हाला काय त्याचे?सरकार बघून घेईल ही वृत्ती.
सत्ताधाऱ्यातील काही महाभाग याच प्रवृत्तीचे.

सामान्य लोक तर पूर्ण साथ गेलीच आहे.? या विचाराने पूर्ण बिनधास्त होऊन वागणारे. कोणताही कार्यक्रम साधेपणाने,
कमीत कमी लोकांत करावा ही वृत्ती ना गरीब, मध्यम वा श्रीमंत लोकांत. नटने, मुरडने हे सुरूच. लोक फक्त लग्न वा अन्य कार्यक्रमासाठी ५०लोकांचा नियम खूप चांगला आहे. त्याने पैशाची बचत होते,
कर्जबाजारीपणा येत नाही,असे म्हणतात. परंतु हे सर्व म्हणण्यापूरते स्वतःवर आले की, नियम गेले खड्ड्यात. लग्न घरात, कोरोना दारात ही स्थिती झाली आहे.
मॉल, हॉटेलमध्ये जाऊन बिनधास्त गर्दी करून खातात. या सर्वच कार्यक्रमात मास्कचा मात्र पद्धतशीरपणे विसर पडतो. इतके सर्व होऊनही गळ्यात मास्क अडकवण्याची पद्धत अजून ही कमी झाली नाही. लोकल गाड्यात अजून ही बरेच लोक मास्क शिवाय असतात. केवळ दंड होतोय म्हणून मास्क वापरण्याची मानसिकताच विचित्र आहे. कोरोनापासून स्वतःचे रक्षण हे स्वतःच करायला हवे. ही काय सरकारची जबाबदारी आहे काय?शेवटी सरकार, सरकारी यंत्रणा तरी काय करणार?

काही लोक लस घेतली म्हणून ही बिनधास्त राहू लागले आहेत.
त्यांनी एक लक्षात ठेवायला हवे, कोरोना नियमांचे पालन त्यांच्यासहित सर्वांनाच अजून बरेच महिने  करावे लागणार आहे. कोरोनाची साथ परत यायला व पसरायला समाजातील सर्वच घटक कारणीभूत आहेत. अजून ही साथ न पसरण्यासाठी, तिला नियंत्रणात आणण्यासाठी नियमांचे योग्य पालन करून समाजातील प्रत्येक माणूस, घटक हातभार लावू शकतो. घरात, बाहेर स्वच्छता ठेवा, नियमित  योग्य प्रकारे मास्क वापरा, हात स्वछ धुवा, दोन व्यक्तीत योग्य अंतर ठेवा, कोणत्याही प्रकारच्या गर्दी होणाऱ्या व असणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याचे टाळा. एवढे जरी प्रत्येक माणसाने प्रामाणिक पणे केले तरी कोरोनाचा प्रसार होणार नाही व त्यास योग्य वातावरण न मिळाल्यास स्वतः हूनच तो जाईल.

शेवटी एक लक्षात ठेवा, कोरोनाच्या भयानक परिस्थितीचा  पुन्हा अनुभव घ्यायचा नसेल तर कोणत्याही औषध वा लसीपेक्षा रोग होऊच  न देणे या साठी रोगप्रतिबंधक उपायांचा अवलंब करणे जास्त महत्त्वाचे आहे. तसेच स्वतःचे रक्षण स्वतःच करायचे आहे ते दुसरे कोणी करणार नाही. घाबरू नका पण
सावध रहा, सतर्क रहा!!

डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *