Article By Dr. Amit Nemane : मानवी जीवन आणि प्रेशर कुकर..!

Article By Dr. Amit Nemane मानवी जीवन आणि प्रेशर कुकर..!

डाॅ. अमित वामन नेमाणे
Pckhabar-नमस्कार वाचक मित्रांनो ! आज आपण एक विशिष्ट विषयावर बोलूयात , साधारणत: ‘ अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर ‘ हे सावरकरांचे लिखाण वाचत असताना “प्रेशरकुकर ” ही संकल्पना मला सुचली आणि त्याचे माणसाच्या आयुष्याची असलेले तांत्रिक नाते देखील स्पष्ट होऊ लागले . रजनीश नावाच्या अोशो आश्रम चालविणाऱ्या एका तत्त्ववेत्त्याने देखील अशाच प्रकारच्या जगण्याच्या पद्धती मध्ये “प्रेशर कुकर ” संकल्पनेला महत्त्व दिल्याचेही दिसून येते.

आयुष्य जगताना माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येतात , हे सांगण्यासाठी तुम्हाला फार मोठा तत्ववेत्ता असण्याची गरज नक्कीच नाही , मात्र तुम्ही बघितले असेल एखादा प्रचंड शांत स्वभावाचा व्यक्ती किंवा अगदी मितभाषी असणारा व्यक्ती असतो चिडतो तेव्हा प्रचंड गरजळ अोकतो , त्याच्या मनातली भडास काढतो. आपण नियमित अशा व्यक्तींना असे म्हणतो की , हा शांत स्वभावाचा माणूस चिडला की फारच चिडतो वैगेरे … त्या विपरीत एखाद्या बडबड्या व्यक्ती हा विशेष त्र्यागा करीत नाही . थोडक्यात आपले मन हे एखाद्या प्रेशर कुकर प्रमाणे असते , जेवढी हवा तुमच्या मन रुपी प्रेशर कुकरमध्ये असेल , ती शिट्टी स्वरूपात बाहेर निघाली पाहिजे अन्यथा ती हवा प्रेशर कुकर वरती प्रचंड प्रेशर देऊन कुकरचा स्फोट होण्याची शक्यता वाढते . अगदी याच पद्धतीने व्यक्तीच्या मनातील कोंदट विचार बाहेर निघाले नाही तर व्यक्तीचा देखील राग अनावर होऊन शाब्दिक चकमकी सातत्याने घडतात . मित्रांनो अगदी अशीच काहीशी संकल्पना ओशो नावाच्या तत्त्ववेत्त्याने त्याच्या आश्रमामध्ये देखील अवलंबिली आहे असे माझ्या वाचनात आलेले आहे . मनात असलेली गोष्ट जर बाहेर आली नाही तर त्या एकदम बांध फूटून तरी बाहेर येतात किंवा त्या तुम्हाला मानसिक व्याधी तरी देत राहतात , असे मानसशास्त्रज्ञ देखील सांगत असल्याची खात्री मी माझ्या एका मनोरोगतज्ञ डॉक्टर मित्राकडून काही वर्षांपूर्वी केल्याचे मला आठवते.

अशाच पद्धतीने देश पारतंत्र्याच्या काळात असतानादेखील अठराशे सत्तावन्न साली इंग्रजांच्या विरोधात मोठा उठाव झाला होता , त्याचे कारण होते भारतीयांच्या मनातील इंग्रज विरोधी असंतोष प्रचंड दाटला होता आणि तोच अठराशे सत्तावनच्या प्रेशर कुकरच्या उठाव स्वरूपी बाहेर पडला होता . याचा अभ्यास काही हुशार इंग्रज अधिकाऱ्यांनी केला आणि १८८५ साली भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित असे या काँग्रेस पक्षाची स्थापना करून दिली .अन्यथा एक इंग्रज अधिकार्‍याला स्वतःच्याच शासनाविरोधात भारतीयांची बाजू घेऊन एखादा पक्ष स्थापन करण्याची गरज ती काय ? त्याकाळी काही मनामध्ये इंग्रज विरोध असलेल्या स्वातंत्र्यसेनानी होते ते प्रत्येक वर्षी काँग्रेसच्या बैठकांमध्ये जाऊन मनातील गरळ भाषणांतून ओकायचे आणि इंग्रजांविरोधात असलेले त्यांचे असंतोष बाहेर काढायचे आणि मोकळे व्हायचे . इंग्रजांची बौद्धिक खेळ पुढे सावरकरांनी हेरली आणि १८५७ चा स्वातंत्र्य समर या पुस्तकांमधून त्यांनी ती जगासमोर मांडली होती आणि हीच गोष्टीला इंग्रजांनी विरोध केला म्हणून १८५७ चे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचे प्रकाशन देखील इंग्रजाने रोखले होते.

वाचक मित्रांनो , ही बाब केवळ मानवी मनाचीच नाही तर हे सूत्र निसर्गातील प्रत्येक गोष्टीला लागू होते. वापरात नसलेली गाडी जर तुम्ही टाकी ठासून इंधन भरणार असाल आणि जर तुम्ही गाडी चालवणार नसाल तर ते वाहन खराब होण्याची शक्यता वाढते . त्याचप्रमाणे दिवसभर जर तुम्ही बैठे काम करीत असाल आणि आहारामध्ये भरपूर ऊर्जा युक्त पदार्थ फस्त करित असाल तर त्या शरीरातील अन्नाचा वापर चरबी वाढविण्यासाठी होतो आणि त्यातूनच पुढे शारीरिक व्याधी देखील जडतात . उदाहरणातून केवळ एकच गोष्ट स्पष्ट होते की निसर्गात प्रत्येक गोष्टींमध्ये प्रेशरकुकर ही संकल्पना लागू होतेच होते.

त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मनातील या विचारांच्या तांडवाला कुठल्या ना कुठल्या मार्गाने बाहेरचा मार्ग दाखविला पाहिजे , मग त्यासाठी तुम्ही मित्रमंडळींमध्ये गप्पा मारा , भाषणे करा , मन मोकळे करा , भरपूर हसा , रडावेसे वाटले तर रडून मोकळे व्हा परंतु मनात अडकलेली ही सुख किंवा दुःखयुक्त भावना बाहेर काढायला शिका आणि व्यक्त व्हा . तरस तुमचा कुकर (येथे मानवी मन अपेक्षित आहे ) आतून स्वच्छ म्हणजे निरागस राहील आणि मन स्वच्छ तर आयुष्य सुंदर आहे असे आपण यापूर्वी कुठेतरी वाचले असेलच की ?

मित्रांनो मनमोकळे करण्याचे अनेक मार्ग आहेत. आपण त्यांना अष्ट कला म्हणून पुराणापासून आोळखतो अष्ट कला म्हणजे जीवन जगण्याचा एक समाधानी मार्ग! मित्रांनो अर्थार्जन किंवा पैसे कमावणे व्यतिरिक्त आयुष्यामध्ये जर आपल्याला मनाने समाधानी राहायचे असेल तर आपण एखाद्या कलेचा अभ्यास करून त्यामध्ये पारंगत्व स्वीकारले पाहिजे असे अनेक तत्त्ववेत्त्यांनी किंवा लेखकाने सांगितल्याचे आपणास परिचित असेल . मात्र यामागची संकल्पना लक्षात घेतली तर , कलेमध्ये ज्यावेळेस आपले मन रमते , त्याच वेळेस मनामध्ये असलेल्या सुख किंवा दुःख विचारांची मार्ग मोकळा होत जातो . आपण हा मार्ग कलेच्या माध्यमातून जगासमोर मांडत असतो. कोणी लिखाणाच्या माध्यमातून, कोणी वक्तृत्वाच्या माध्यमातून , कोणी गायन कलेतून की कोणी मित्र मैत्रिणीच्या गप्पांतून, कोणी अभिनयातून, तर कोणी मद्यप्राशन केल्यानंतर शिवतांडव करून मनातील असंतोषाची वाट मोकळी करीत असतो. मात्र हे करायला आपण शिकलात तर मन स्वरूपी मंदिराची आपण पूजा करीत आहात असे म्हणायला हरकत नाही ( येथे मद्यपानाचे समर्थन मि करीत नाही )

संपूर्णपणे स्वच्छ, मोकळे ,निरागस मन तुम्हाला खऱ्या आयुष्याचा निखळ आनंद देत असते , हे जर आपण ओळखले तर आपल्याला आयुष्याचे सूत्र लक्षात आले म्हणावे लागेल . मित्रांनो , आपण आपल्या प्रेशरकुकर ची हवा कुठल्या शिट्टी स्वरूपातून बाहेर काढता ? कळवा बरे !!

लेखक
डॉ. अमित वामन नेमाणे
(दंतरोग तज्ञ आणि वक्ते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *