Article By dr. Ankush jadhav : ‘उपवास-लंघन’

 

Article By dr. Ankush jadhav : उपवास -लंघन
Pckhabar- उपवास यालाच लंघन हा दुसरा शब्द आहे, असे मानतात. परंतु उपवास व लंघन यात थोडासा फरक आहे. जवळ जवळ ८० ते८५ टक्के लोक देवासाठी आठवड्यातून एक वा दोन दिवस उपवास करतात. जगातील सर्वच धर्मात उपवास करण्यास सांगितले आहे. आपल्या हिंदू धर्मात संकष्टी, चतुर्दशी, एकादशी, नवरात्र, महाशिवरात्री इ. हे जसे उपवास आहेत. तसेच मुस्लिमांत रोजा, जैनांत पर्युषण असे उपवास आहेत. उप म्हणजे जवळ व वास म्हणजे वास्तव्य वा असणे. देवाजवळ असणे हा सामान्य अर्थ. परंतु जगण्यासाठी सतत धडपड करावी लागत असल्याने सतत देवाजवळ राहून पोट भरणार नाही. यासाठी देवाच्या एकाग्रतेत रहावे, सतत त्याचा नामोच्चार करावा, देव प्रसन्न व्हावा म्हणून आठवड्यातून एक दिवस तरी देवाच्या चिंतनासाठी देण्यात यावा, या विचारातून उपवासाची सुरवात झाली.

वास्तविक पाहता हे जरी खरे असले तरी उपवास ही कल्पना आरोग्य चांगले राहावे यातून निघाली असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपण आठवडाभर काम केल्यानंतर शरीर व मनाला विश्रांती मिळावी यासाठी सुट्टी घेतो. आपण सातत्याने काही तरी खात असतो, दिवसातून दोन – तीन वेळा जेवत असतो. यासाठी आपली पचनसंस्था सतत कार्यरत असते. सतत कार्यरत राहणाऱ्या पचनसंस्थेलाही विश्रांतीची गरज असते. ही विश्रांती आपण आठवड्यातून एक दिवस उपवास करून देत असतो. परंतु सध्या उपवासाचा अर्थच बदलत जाऊ लागला आहे. आपल्याकडे एक म्हण आहे” एकादशी व दुप्पट खाशी” असाच काहीसा प्रकार उपवासाच्या बाबतीत होऊ लागला आहे. उपवास म्हंटले की,आपण नेहमीचे अन्न न खाता साबुदाण्याचे पदार्थ, रताळी, खजूर, कॉफी इ.पदार्थ घेतो. परिणामी पचनसंस्थेला अपेक्षित विश्रांती मिळत नाहीच उलट दुप्पट काम करावे लागते. उपवासाच्या बाबतीत दुसरे एक दिसून येते की, ज्या ज्या भागात जे पदार्थ अधिक होतात, ते न खाता तेथे न होणारे पदार्थ खाणे. थोडक्यात नेहमीच्या आहारात बदल करणे.

आठवड्यातून एक दिवस आहारात बदल करणे म्हणजे उपवास, असा अर्थ न घेता शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. ती ठेवण्यासाठी परंतु पचनसंस्थेला पचन करण्यासाठी कोणताही त्रास न पडणारे पचनास हलके उदा. वारंवार गरम पाणी पिणे, गरम दूध पिणे, फलाहार, लिंबू सरबत असे पदार्थ प्यावेत, खावेत. जेणे करून सध्याच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात शरीरास शक्ती मिळून दररोज चे काम चालावे. शरीरास अशक्तपणा येऊ नये म्हणून.

आयुर्वेद शास्त्रात उपवास (लंघन) याबद्दल सविस्तर चर्चा केली असून कोणत्या रोगात लंघन करणे उपयोगी आहे ते सांगितले आहे.
” यत् किंचित लाघवकरं देहे तत् लंघन स्मृतम” ज्याच्या योगे शरीरात लाघवता, लघुता वा हलकेपणा येतो. त्यास लंघन असे म्हणतात. आयुर्वेदानुसार सर्व रोगांचे मूळ कारण अग्निमांद्य असून यामुळे आम या अपक्व रसाची निर्मिती होते. अनेक रोगांची निर्मिती यापासूनच होते. लंघनाने अपक्व रसाचे पचन होते. म्हणून लंघन हे अनेक रोगांवर प्रभावी औषध आहे. लंघन करण्यापूर्वी वा करण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर चा सल्ला अवश्य घ्यावा.

उपवास काळात अनावश्यक घटकांच्या पचनासाठी शरीरात पित्ताची निर्मिती अधिक प्रमाणात होते. याच वेळी साबुदाण्याचे पदार्थ, शेंगदाणे, दही, चहा, कॉफी सारखे पदार्थ खाण्याने पित्ताची निर्मिती अधिकच प्रमाणात होऊन विविध प्रकारचे विकार, आजार होतात. हे सर्व पदार्थ उष्ण व पित्तवर्धक असल्याने ज्यांना आम्लपित्त, पोटातील जखमा(अल्सर), त्वचेचे व रक्ताचे आजार आहेत त्यांनी तर हे टाळणेच चांगले. ज्यांना उपवास सहन होत नाही, त्यांनी न करणे चांगले.

उपवासाने अनेक रोग बरे होण्यास मदत होते. मन उल्हासित व शरीर हलके होते.
उपवास म्हणजे आहारात बदल नव्हे, तर पचनसंस्थेला पूर्ण विश्रांती.

डॉ.अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली).
(डॉ अंकुश जाधव लिखित व मनोविकास प्रकाशन प्रकाशित “काय खावे, काय खाऊ नये” या पुस्तकातून साभार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *