Cyber News: चिनी हॅॅकर्सचा स्मार्ट सिटीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला ; बीटकॉईनच्या माध्यमातून खंडणीची मागणी
Pckhabar- बीटकॉईनच्या माध्यमातून खंडणी मागत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी वापरल्या जाणार्या 27 सर्व्हरवर चीनच्या हॅकर्सने हल्ला केल्याने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा प्रकार 26 फेब्रुवारी रोजी घडला असून याबाबत 9 मार्च 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत टेक महिंद्रा कंपनीचे प्रोग्राम मॅनेजर महेंद्र लक्ष्मीनारायण लाठी (वय 55) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सायबर सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार यांनी माहिती दिली. पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीची सर्व्हर रूम निगडी प्राधिकरण येथील अस्तित्व मॉल येथे आहे. सर्व्हरवर अॅटक केलेल्या हॅकर्सचे आयपी अॅड्रेस हे प्रथमदर्शनी चीनचे दिसून येत आहेत. 27 सर्व्हरमधील डेटा इनस्क्रिप्ट करण्यात आला आहे. तो डेटा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी आरोपींनी बिटकॉइनच्या माध्यमातून खंडणी मागितली. ज्या व्यक्तीने हा डेटा इनस्क्रिप्ट केला आहे, त्याच व्यक्तीला तो डेटा डिस्क्रिप्ट करता येतो.
तसेच हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि इतर खर्च असा सुमारे पाच कोटी किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. या सायबर हल्या प्रकरणातील तपासासाठी परदेशातील एजन्सी कशा पध्दतीने मदत करतात, त्यावर तपास अवंलबून आहे. तपासासाठी मर्यादा आहेत. मात्र, सायबर सेलच्या वतीने निश्चितच प्रयत्न केले जातील, असेही सायबर विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुंगार यांनी सांगितले.










Leave a Reply