
Pimpri News: आश्चर्यकारक…! चिखलीत सापडली तीनशे वर्षांपूर्वीची 216 सोन्याची नाणी
Pckhabar-बांधकामाचा पाया खोदताना सापडलेली ऐतिहासिक नाणी बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवणार्यांना दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 300 वर्षांपूर्वीची 216 सोन्याची नाणी आणि 525 ग्रॅम वजनाचा कांस्य धातूचा तांब्या हस्तगत केला आहे. ही ऐतिहासिक नाणी पोलिसांनी पुरातत्व विभागाकडे सुपूर्त केली आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याप्रकरणी सदाम सालार पठाण आणि मुबारक शेख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चिखली परिसरात गस्त घालत असताना पोलीस नाईक बाबालाल तांबोळी यांना माहिती मिळाली की, नेहरूनगर येथे राहणार्या सद्दाम सालार खां पठाण याच्याकडे इतिहासकालीन सोन्याची नाणी आहेत. ती त्याने बेकायदेशीरपणे स्वतःकडे ठेवली आहेत. त्यानुसार पोलिसांनी नेहरूनगर येथे संबंधीत व्यक्तीच्या घरात छापा मारला. पठाण याचे सासरे आणि मेहुणा गावाहून कामानिमित्त पिंपरीत आले होते. पठाण याने एका मध्यस्थी व्यक्तीच्या मदतीने त्या दोघांना चिखली येथील एका बांधकामाचा पाया खोदण्याच्या कामावर लावले होते. पाया खोदत असताना त्यांना पाच ते सहा जुनी सोन्याची नाणी आढळली. त्यानंतर दुपारच्या वेळेत जावून तिथल्या मातीच्या ढिगार्यात शोध घेऊन 525 ग्रॅम वजनाचा कांस्य धातूसारखा तुटलेला तांब्या आणि त्यात असलेली 216 सोन्याची नाणी शोधली. ती नाणी त्यांनी कुणालाही न सांगता स्वतःकडे ठेवली. ही नाणी कोणाला किती घ्यायची यावरून आरोपी यांच्यात वादावादी झाल्याने त्यांच्याकडील नाण्याचे बिंग फुटले. तसेच ही सर्व नाणी आरोपी विकणार होते, असे पोलिस तपासात समोर आले.
खोदकामात सापडलेली इतिहासकालीन नाणी सन 1720 ते 1750 या कालखंडातील आहेत. त्यावर उर्दू व अरबी भाषेत राजा मोहमद शाह यांची मुद्रा उमटविण्यात आली असल्याचे पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे. ही नाणी जयपुर येथील टकसालमध्ये तयार झाले आहे. एका नाण्याचे वजन 10.8 ग्रॅम असून याची लाखो रूपये किंमत आहे.










Leave a Reply