Women’s day Article By Dipjyoti Yadav: ‘स्त्री ही आजच्या युगाची प्रगती’!

लेखिका- दिपज्योती यादव-पवार
Pckhabar-
आदिशक्ती तू,
प्रभूची भक्ती तू,
झाशीची राणी तू,
मावळ्यांची भवानी तू,
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू,
आजच्या युगाची प्रगती तू!!!
21 व्या शतकात सर्वच क्षेत्रात महिलांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पुरूषांच्या बरोबरीने महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत. महाराष्ट्राच्या मातीला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारांचा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नेतृत्वाचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे नेण्याचे काम स्त्रीया करत आहेत. स्त्रीशक्ती हा वारसा अधिक समर्थपणे, यशस्वीपणे पुढे नेत आहे याचा आपल्या सर्वांना आनंद, अभिमान आहे. स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा!
8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 1975 साली संयुक्त राष्ट्रांनी हा एक वार्षिक उत्सव म्हणून थिमसह साजरा करण्यास सुरुवात केली. तेव्हापासून अधिकृतपणे जागतिक महिला दिन साजरा केला जातो. अगदी पुरातन काळापासून विचार केला तर समाजामध्ये स्त्रियांना नेहमीच आपल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढा द्यावा लागला आहे. हा लढा अगदी सितेपासून सुरू होऊन आत्ताच्या प्रत्येक पीडित स्त्रिपर्यंत चालूच आहे. फक्त जसा काळ लोटेल तस लढ्याचे स्वरूप बदलले आहे. त्या काळी सीतेला आपले चारित्र्य सिध्द करण्यासाठी लढा द्यावा लागला होता आणि आताच्या सीतेला आपले चारित्र्य वाचवण्यासाठी आपला लढा द्यावा लागत आहे.
समाजात वावरताना महिलांच्या बाबतीत सकारात्मक गोष्टींपेक्षा नकारात्मक गोष्टी अधिक घडत आहेत. हे काही प्रमाणात खरं असलं तरी समाजात महिलांबाबत दिवसेंदिवस आदर, मान सन्मानही वाढत आहे, हे सुद्धा नाकारून चालणार नाही. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रात महिला आज कार्यरत आहेत.
आत्ताच्या आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा विचार केला तर खरंच असे वाटते की, मुलगी म्हणून जन्माला येणं ही खरोखरच चूक आहे का? किंवा आपल्याला मुलगी झाल्यानंतर ती या वातावरणात सुरक्षित राहू शकेल का? वर्तमानपत्र उघडल्यानंतर त्यामध्ये एक- दोन बातम्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या असतात. मग तो अत्याचार कोणत्याही स्वरूपाचा असू देत. स्त्री जेव्हा आपले विश्व निर्माण करण्यासाठी घराबाहेर पडते तेव्हा बाहेरच्या वातावरणात तिला सुरक्षित वाटणे फार आवश्यक आहे. परंतु स्त्री बाहेर पडल्यानंतर पुरुषांची जबाबदारी काय आहे हे पुरुषांच्या ध्यानी मनीही नाही. परिणामी भारतासारख्या पितृसत्ताक देशामध्ये पुरुषांची मानसिकता बदलणे खूप अवघड आहे. त्यात भर म्हणजे आपल्या हातात असलेला मोबाईल फोन. त्यामध्ये असलेल्या सोशल मीडियामुळे अनेक नकारात्मक गोष्टींचा भरणा असतो. कुठलीही छोटीशी गोष्ट अतिशय वेगात पसरते. ती गोष्ट चांगली असेल तर त्याचा फायदा होतो, परंतु ती गोष्ट जर वाईट असेल तर त्याचा खूप मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागतो. त्यातच स्त्रियांविषयी एखादी गोष्ट असेल तर त्यावरच्या प्रतिक्रिया अतिशय अश्लील, स्त्रीयांना तुच्छ लेखणाऱ्या, मनाला लागणाऱ्या असतात.
स्त्रियांना समाजात वावरत असताना दुसऱ्या स्त्रियांकडून देखील सहकार्य मिळणे अपेक्षित असते. परंतु सगळ्याच स्त्रियांकडून तसे सहकार्य मिळत नाही. स्त्रियांकडूनच स्त्रियांची कुचंबना केली जाते. स्त्रियांनी स्त्रियांचा आदर केला, काळजी घेतली तर स्त्री अत्याचाराचे प्रमाण बरेच कमी होईल. ज्या घरातील स्त्री मानसिकरीत्या सुखी असते त्या घरामध्ये नेहमी सुख शांती असते. परंतु सध्या स्त्री घरामध्ये सुध्दा सुरक्षित नाही.
स्त्रियांनी घराबाहेर पडून प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले अस्तित्व निर्माण करायला सुरुवात केली खरी पण तेच अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त संघर्ष करावा लागतो. कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्रियांनी वरचढ होऊ नये असे पुरुषांना वाटत असते.(अर्थात काही पुरुष यासाठी अपवाद आहेत.) स्त्री तिच्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत असेल तर पुरुषांकडून तिला रोखण्यासाठी साम दाम दंड भेद या नीतीचा अवलंब केला जातो. आपल्या इथे गावातील सरपंच जरी महिला असली तरी गावाचा कारभार सगळा पुरुषांच्या हातात असतो. महिला फक्त नामधारी सरपंच असतात. राजकारणातील प्रत्येक पदाची हीच अवस्था आहे.
वर्षातून एकदाच महिला दिन साजरा करून चालणार नाही तर समस्त पुरूष मंडळींनी स्त्रीशक्तीला हक्क, मान-सन्मान, सुरक्षित वातावरण देण्याचा निर्धार केला तरच खऱ्या अर्थाने एक महिला म्हणून महिला दिन साजरा करताना आनंद आणि अभिमान वाटेल!










Leave a Reply