Mumbai news: तुम्ही २०१४ ला युती तुम्ही तोडली, तेंव्हाही आम्ही हिंदु होतो, आज ही आहोत, उद्या ही राहू : मुख्यमंत्री
Pckhabar- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यपलांच्या आभिभाषणावरील अभिनंदनाच्या प्रस्तावावरील चर्चेला आक्रमकपणे उत्तर देताना महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर भाजप कडून गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या टिकेला रोखठोक भाषेत प्रत्युत्तर दिले.
संत तुकाराम यांच्या अंभगाचा दाखल देत त्यांनी सांगितले की, तुका म्हणे शुध्द नाही जो आपण तया अवघे जन हे खोटे.
बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा उमाळा
मुख्यमंत्र्यानी भाषणात सांगितले की, भाजपला सध्या बाळासाहेब आणि त्यांच्या हिंदुत्वाचा उमाळा आला आहे मात्र बाळासाहेबांची जी खोली म्हणता ते आमचे मंदीर आहे. त्या मंदीरात बंद दरवाजाआड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांसोबत पुढच्या वाटचालीची चर्चा केली होती, त्यावेळी तेंव्हा देवेंद्र यांना बाहेर का थांबवले ते मला समजले नाही पण तेथे जे काही ठरले ते नाकारू नका, ते म्हणाले की, आता तरी निर्लज्जपणाने आत ठरलेली गोष्ट बाहेर नाकारता, हे तुमचे हिंदुत्व आहे का ? ते म्हणाले की आम्हाला हिंदुत्व सोडले म्हणता पण ज्यावेळी तुम्ही २०१४ ला युती तुम्ही तोडली, तेंव्हाही आम्ही हिंदु होतो, आज ही आहोत, उद्या ही राहू. ठाकरे म्हणाले की, सर्जल उस्मानी बद्दल बोलतांना आम्ही तो पाताळात गेलो तरी शोधून काढू म्हटलेत. पण ती घाण महाराष्ट्राची नाही उत्तरप्रदेशात राहते. अशा पिल्लावळीचे पोषण तुमच्याकडून होत असेल तर तुमचा हिंदुत्वाचा पाया ठिसुळ असेल तर मंदीर कसे बांधणार? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, आम्ही उस्मानीला पकडणारच म्हणजे पकडणारच.
भरलेली थाळी आणि रिकामी थाळी
सुमारे तासभर विधानसभेत केलेल्या भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर, आमच्या सगळ्या कामांना कायद्याचा आधार आहे. पण सुधीर मुनगंटीवार यांचे भाषण पाहताना मला नटसम्राट पाहतोय असे वाटले! ते म्हणाले की, राज्यपाल महादेयांचे भाषण आपण सर्वांनी ऐकले. त्याबद्दल राज्यपालांना धन्यवाद देतो. त्यांनी नि:पक्षपातीपणे सरकारची कामगिरी सर्वांसमोर ठेवली. ते मराठीत बोलले त्याचा अभिमान आहे. मात्र त्यांनी मांडलेल्या मुद्दांवर अनेकांना आक्षेप आहेत. राज्यपालांनी भाषण मान्य केले पण त्यांच्याच सदस्यांना ते मान्य नाही. मग राज्यपाल आपण संस्था मानता त्या संस्थेवरच आपण अविश्वास व्यक्त केला आहे का? असा सवाल त्यानी केला.
मुख्यमंत्री म्हणाले की आमच्या शिवभोजनवर टिका केली जाते. पण आपल्या राष्ट्रपतीच्या भाषणात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेत आठ महिन्यांसाठी ८० कोटी लोकांना मोफत धान्य दिल्याचे म्हटले मग ते लगेच श्रीमंत झाले का? गॅस, इंधन कोणतीही दरवाढ झालेली यांना चालते. आम्ही शिवभोजन थाळी पाच रुपयांमध्ये दिली जी अजून सुरु आहे. ते म्हणाले की, भरलेली थाळी आणि रिकामी थाळीतला फरक गरीबांना कळतो.
छत्रपती नसते तर
· सीमाप्रश्नी देवेंद्रजीना मनापासून धन्यवाद. राजकीय जोडे बाजूला ठेऊन राज्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागते. सीमाप्रश्नी एकत्र येण्याची तयारी दाखवल्याबद्दल कर्नाटकवासी मराठी बांधवांच्यावतीने धन्यवाद देतो कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर कशी सक्ती लादते ते मोडून तोडून काढू असे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा गौरव दिन. आपण नेहमी म्हणतो मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ पण अजूनही केंद्राकडून मातृभाषेला दारात तिष्ठत उभे केले. मराठी भाषा भिकारी आहे का, ही छत्रपतींची भाषा. ती भाषा भिकारी कशी असू शकते. ते म्हणाले की, छत्रपती नसते तर दिल्लीत जे बसले ते तरी असते का? केंद्राचा हा करंटेपणा महाराष्ट्र कधीच विसरणार नाही, मराठी माती, मराठी माता हे विसरणार नाही असे ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, सावरकरांना भारतरत्न द्या यासाठी दोन वेळ पत्र दिले. १८ आणि १९. भारतरत्न कोण देऊ शकतो, आमदारांची कमिटी हा देऊ शकते का, हा अधिकार पंतप्रधान कार्यालयाला. ते का देत नाहीत हे का विचारत नाही? आपला देश प्रत्येक क्रिकेट मॅच जिंकणार कारण स्टेडियमचे नाव बदलले, वल्लभभाईचे नाव पुसून टाकता, आणि आम्हाला औरंगाबादचे विचारता पण आम्ही संभाजीनगर करूच असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, याच विधानपरिषदेत संभाजीनगरच्या विमानतळाचे छत्रपतीचे नाव ही केद्राने अडवून ठेवले आहे.
धमक लागते
ते म्हणाले की, तुम्ही मेरे वतन के लोगो कविता ऐकवलीत… मी म्हणेन, ए महाराष्ट्र के लोगो, पोछ लो आँख का पानी, जो झुट बोले उनकी खतम करो बेईमानी… देवेंद्र म्हणाले की, भाषणामध्ये यमक नाही तर काम करण्याची धमक पण लागते… ती आमच्या आहे देवेंद्रजी असेही मुख्यमंत्री म्हणाले. समर्थ रामदासांच्या ओळीचा दाखला देत ते म्हणाले की, मना सर्वथा सत्य सोडू नको रे , मिथ्य सोडू नको रे. किमान आता तरी मिथ्य तरी सोडा असे आवाहन मी विरोधकांना करतो. ते म्हणाले की, माधव भंडाराची गोष्ट आठवते… माधव नाही… नारायण भंडारी… माधव आणि नारायण दोघेही दिव्यच आहेत, नारायण भंडारीला मोठे करणार की नाही, ही कथा ज्याने तुम्हाला लिहून दिली त्यानेच पुढची मला लिहून दिली. असे म्हणत त्यानीनारायण भंडारीची कथा पूर्ण केली.
फेसबूक लाईव्ह
· मुख्यमंत्री म्हणाले की, आपण फेसबूक लाईव्हचा उल्लेख केला. मी महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावे काय करू नये हे सांगितले.त्यामुळे महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या परिवारातील एक मानू लागले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. मात्र रुग्ण संख्या वाढते आहे आज, काय करायचे काही नाही.? असा सवाल त्यांनी केला… ते म्हणाले की, दुर्देवाने थोड इकडे तिकडे झाले आणि मी पुन्हा येईन म्हणत व्हायरस परत आला. माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत महसूल, आरोग्याचे कर्मचारी राज्यात घरोघर गेले. यामुळे सहव्याधी असलेले रुग्ण लक्षात आले. त्यासाठी सरकार खबरदारी घेत आहे. देशात जगात पहिले जम्बो हॉस्पीटल आपण उभे केले. किती जणांना उपचार दिले ही माहिती ही आपल्याकडे आहे. ते म्हणाले की, ज्या केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालाचा हवाला दिला जातो तो कुणी तयार केला आहे पहा. ज्यांनी नोटबंदीच्यावेळी त्यांची स्तुती केली ते यात काम करत होते. ते अर्थशास्त्राचे डॉक्टर. या आपत्तीच्या काळात अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वैद्यकीय शास्त्राचा कंपाऊंडर बरा ! त्यांनी बिहार आणि इतर राज्याची तुलना करत निष्कर्ष काढला. ते म्हणाले की, बिहारचा फोलपणा इंडियन एक्सप्रेसने समोर आणला. त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या महाराष्ट्र तुम्ही बंद करणार?
खोटे बोलत नाही
ते म्हणाले की, महाराष्ट्रात रुग्णसंख्या आहे आपण ती लपवली नाही. मार्चमध्ये प्रादुर्भाव सुरु झाला, हॉस्पीटल, बेड नव्हते, रुग्ण आल्यानंतर स्वॅब घेतल्यानंतर रिपोर्ट येऊपर्यंत मृत्यू व्हायचा पारदर्शीपणे माहिती दिली. त्यांना बीपी हार्ट प्रॉब्लेम होते… आणि नंतर त्यांना करोना झाल्याचे ही दिसून आले. मुख्यमंत्री म्हणाले की, ८० टक्के टेस्ट आरटीपीसीआर टेस्ट होतात. आम्ही खोटे बोलत नाही कारण खोट बोलणं आमच्या रक्तात नाही. मग ती बंद दाराआड झालेली चर्चा का असेना. ते म्हणाले की, हिंदुस्थान टाईम्स ने ही कोरोना काळातल्या कामाबाबत वृत्तमाला चालवली आहे. पंतप्रधानांनी अचानक लॉकडाऊन केला. मी त्यांना फोन केला. लोकल थांबवण्यासाठी प्रयत्न करा, मजुरांना जाण्यासाठी ट्रेन द्या पण तेंव्हा त्यांनी काही नाही केले. लॉकडाऊन केले आणि मग लोक लाखो लोक घरी जात असतांना तांडे च्या तांडे पायी गेले. या लोकांना मोफत अन्नधान्य दिले, त्यांच्या राज्यात जाण्याची व्यवस्था केली. आपापल्या राज्यात गेल्यानंतर उत्तरप्रदेश आणि बिहारच्या लोकांनी इथे उगीच आलो, महाराष्ट्राने यापेक्षा आमची काळजी घेतली असे प्रशंसोद्गार काढले
पीएम केअर फंडचे काय?
ते म्हणाले की, आमच्याकडे कोविडचा हिशोब विचारता, जरुर विचारा मात्र महाराष्ट्रातील जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी उपायोजना कराव्या लागतात तेंव्हा आपला फंड महाराष्ट्राला न देता, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला न देता दिल्लीला दिला, ज्यांनी तो दिला त्यांना धन्यवाद. फोल फोल करून नका पोल ला वेळ आहे ते म्हणाले की, पीएम केअर फंडचा हिशोब कोण देणार, त्यांना विचारायचे नाही, हा फंड चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. आणि कुणी धाडस करून विचारलं की काय? असा सवाल त्यानी केला,. ते म्हणाले की, मला व्हिलन ठरवले तरी चालेल,वाईट म्हटले चालले तरी मला पर्वा नाही. मी माझ्या राज्याशी बांधील आहे. त्यांची काळजी घेणे माझे कर्तव्य. काही चुकीचे होत असेल तर नक्की कारवाई करू. संकटाशी खेळ करू नका. आमदार खासदार मृत्यूमुखी पडले… हा व्हायरस कुणाला ओळखत नाही. ते म्हणाले की, थट्टा कुणाची करता, माझे कुटुंब माझी जबाबदारीची थट्टा करताय, करा, पण सामान्यांच्या जीवाशी खेळू नका. गर्दी झाली असेल तर दुर्देवी. पण यापुढेही लाट आपण वाढू देऊ नये असे मुख्यमंत्री म्हणाले.
पंजाबचा शेतकरी रस्त्यावर
·
मुख्यमंत्री म्हणाले की, संत नामदेव यांचे स्मरण झालेच पाहिजे. आपण एकत्र बसून राज्याची अनमोल रत्ने निश्चित करू. मग महिला असो किंवा पुरुष. त्यांचे नाव काढू. ते मोठे होते म्हणून आपण होतो. संत नामदेव मराठी मातीच्या पुत्राने पंजाबात जाऊन काम केले, शेतकऱ्यांसाठी काम केले. पण आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आहे. जे शेतकरी तिकडे आंदोलनासाठी बसले त्यांची वीज कापली जाते, त्यांची शौचालये तोडली जात आहेत, पाणी तोडले जात आहे, एवढेच नाही तर सार्वभौम देशाच्या राजधानीत ते येऊ नये म्हणून मार्गावर खिळे ठोकले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मर्गात खिळे आणि चीन दिसला पळे ही भूमिका बदलून या सीमेवर खिळे ठोकले असते तर तो देशात घुसला नसता शेतकरी देशद्रोही आहे का, देश ही तुमची खाजगी मालमत्ता नाही.ते म्हणाले की, शिवसेना स्वातंत्र्य लढ्यात नव्हती पण तुमची मातृसंस्थाही स्वातंत्र्य लढयात नव्हती मात्र· शेतकऱ्यांना ताटकळत ठेवत असाल, त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असाल तर देश तुमची खाजगी मालमत्ता नक्कीच नाही, आणि महाराष्ट्र तर नाहीच नाही
येरेगबाळे पळून गेले.
मुख्यमंत्री म्हणाले की, बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढली… त्यांना विसरला नाहीत. धन्यवाद. पण त्यांचे हिंदुत्व तरी विसरू नका. बाबरी पाडतांना येरेगबाळे पळून गेले… बाळासाहेब राहिले होते. शिवसेनाप्रमुखांनी म्हटले जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला अभिमान आहे. आणि हे म्हणाले आम्ही नाही पाडली. मुख्यमंत्री म्हणाले की, राममंदिरासाठी आता घरोघर पैसे मागता… पण नाव मात्र आमचे राहिले पाहिजे हा आग्रह का आहे? ते म्हणाले की, काश्मिर पंडित निर्वासित होऊन जगत होते तेंव्हा शिवसेनाप्रमुखांमुळे काश्मिरी पंडितांना हक्काचे स्थान मिळाले. आमचे हिंदुत्व काढत असतांना काश्मिरमध्ये फुटीरतावादांबरोबर सत्ता स्थापन केली तेंव्हा कुठे गेले होते तुमचे हिंदुत् हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकवू नका, तुम्ही त्याला पात्र नाही
बसून मार्ग काढू
ते म्हणाले की, आरेची कारशेड काही वर्षांनी ती अपुरी पडणार, मेट्रो ४, ४ ए आणि ३ ची लाईन एकत्र करू या. त्यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथपर्यंत कनेक्टिव्हिटी वाढेल. कांजूरमार्ग जागा केंद्र म्हणजे त्यांची, राज्य म्हणते त्याची… सीमा प्रश्नी जसे एकत्र येता तसे लोकहितासाठी एकत्र या, मेट्रो प्रकल्प दोन्ही सरकारचा तर खेचाखेची कशाला, एकत्र बसून मार्ग काढू असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, खर्च ही आगडबंब होत नाही आणि जो खर्च होईल ती पुढच्या ५० वर्षापर्यंतची गरज भागवण्यासाठी होईल. कृपा करून यात राजकारण करू नका. मेट्रोत आपल्याला एकत्र जाण्याची संधी मिळेल. मुख्यमंत्री म्हनाले की, शिवभोजन पाठ थोपटवून घेणारी नसली तरी पोट भरणारी योजना आमच्या योजनांचे वाभाडे काढले, गॅसच्या किंमती वाढल्या, उज्वला गॅस योजनेचे काय झाले ते म्हणाले की, खोट बोलून लाट येते, सत्ता येते पण ती टिकवणे कठीण त्यावर त्यानी विं. दा करंदीकर यांची कविता सादर केली.







Leave a Reply