Pimpri crime news: गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर दरोड्याचा गुन्हा; टोळीवर मोक्काची कारवाई होणार
Pckhabar- कारागृहातून सुटल्यानंतर रॅली काढणे कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना चांगलेच महागात पडले आहे. सुरुवातीला दहशत माजवल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मारणे टोळीवर आत्तापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गजानन मारणे आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन मारणे याची 15 फेब्रुवारी 2021 रोजी तळोजा कारागृहातून सुटका झाली. त्यानंतर त्याच्या समर्थकांनी गजाची शेकडो गाड्यांच्या ताफ्यात तळोजा ते पुणे अशी मिरवणूक काढली. पुणे-मुंबई-द्रुतगती मार्गावर उर्से टोलनाक्यावर फटाके फोडून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यावेळी मारणेच्या साथीदारांनी टोल न देता वाहने पुढे नेली. तसेच तेथील दुकानातून पाण्याच्या बाटल्या, वडापाव आदी साहित्य जबरदस्तीने लुटून नेले. सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, रॅली प्रकरणात यापूर्वी शिरगाव चौकी आणि हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात शिरगाव पोलिसांनी आतापर्यंत 14 वाहने जप्त केली असून 36 जणांना अटक केली आहे.
गजा मारणे टोळीवर मोक्काची कारवाई करणार
गजा मारणे टोळीवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे मारणे टोळी मोक्काच्या कारवाईसाठी पात्र झाली आहे. त्याबाबत योग्य कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरातून मारणे असेल किंवा अन्य कोणत्याही टोळीची पाळेमुळे उखडून टाकणार, असेही पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.










Leave a Reply