Talegaon Dabhade news: विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

ही बातमी शेअर करा.

Talegaon Dabhade news: विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई
Pckhabar- कोरोनाचा  प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे तळेगाव शहरात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर तळेगाव दाभाडे पोलीस आणि नगर परिषदेच्या वतीने 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच  गांधीगीरीच्या माध्यमातून त्या नागरिकास मास्क देण्यात येणार आहे.

नगर परिषदेच्या सभागृहात नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी, शहरातील वैद्यकीय अधिकारी यांची संयुक्त सभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी तळेगाव दाभाडे पोलीस  स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, सभागृह नेते अमोल शेटे, नगरसेवक अरुण माने, डॉ.अनंत परांजपे, डॉ.अनिल ऊनकुले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. वामन गेंगजे, डॉ.दीपक ढवळे, आरोग्य निरीक्षक मयूर मिसाळ, प्रमोद फुले,  अस्थापना प्रमुख भास्कर वाघमारे, जनसंपर्क अधिकारी रवींद्र काळोखे सह डॉक्टर, नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी नागरिकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे, वेळोवेळी हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी न जाने, सँनीटायझरचा वापर करणे, सार्वजनिक कार्यक्रमात शासनाने ठरवून दिलेल्या उपस्थितीचे पालन करणे आदी सूचना करण्यात आल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शहरातील नागरिकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन तळेगाव दाभाडे पोलीस  स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, आरोग्य समिती सभापती किशोर भेगडे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी केले आहे.


ही बातमी शेअर करा.