Pune News: पुण्याचे महापौर म्हणतात महापालिका सज्ज, पण काळजी घ्या!
Pckhabar-मागील आठवड्यात असणारा कोरोनाचा ४.६ टक्के इतका पॉझिटिव्हीटी दर आता १२.५ टक्क्यांवर पोहोचला असून उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. या पार्श्वभूमीवर आज तातडीने आढावा बैठक घेत विविध सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. संसर्ग वाढत असला तरी तो नियंत्रणात असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत. शिवाय पुणेकरांनी काळजी न करता, काळजी घ्यावी, अशी विनंती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना केली आहे.
कोरोना आढावा बैठकीला उपमहापौर सरस्वतीताई शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. हेमंत रासने, सभागृह नेते श्री. गणेश बिडकर, शिवसेना गटनेते श्री. पृथ्वीराज सुतार, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, सहा.आरोग्य अधिकारी डॉ. अंजली साबणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच आरोग्य विभागातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
कोरोनाबाधित उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची कमी होणारी संख्या गेल्या दहा-बारा दिवसांपासून वाढू लागली आहे. सिंहगड रोड, नगर रोड, बिबवेवाडी आणि वारजे क्षेत्रीय कार्यालय परिसरात संसर्ग वाढताना दिसत आहे. याभागात संसर्ग वाढला तर पुन्हा कंटेन्मेंट झोन सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. सध्या शहरात १७ स्वॅब सेंटर सुरू आहेत. दिवसाला ३०००-३५०० हजार स्वॅब टेस्ट केल्या जात आहेत. चार वॉर्ड ऑफिस परिसरात नव्याने स्वॅब कलेक्शन सेंटर वाढविण्यावर निर्णय घेण्यात आला आहे.
सध्या कोणतेही निर्बंध नव्याने लागू करण्याचा महापालिकेचा विचार नसला तरी मोठी खबरदारी घेत आहोत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे, तसेच लग्न समारंभाच्या नागरिकांच्या संख्येवरील निर्बंधाचे बंधन कठोर करण्याचा विचार केला जात आहे.










Leave a Reply