Bhosari news: आव्हाने स्वीकारा, सक्षम बनाल- प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Bhosari news: आव्हाने स्वीकारा, सक्षम बनाल- प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया

Pckhabar-विद्यार्थी चैतन्याचा झरा आहे. समाज, कुटुंब, शिक्षण, अर्थकारण, संस्कृती, राजकारण व पर्यावरण या परिघातून विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने जडणघडण होते. कधीकधी अशी काही संकट येतात कि ती बरेच काही शिकवून जातात. गेली अकरा महिने व आजतागायत ज्याचे अस्तित्व आहे अशा कोरोनाने बरंच काही शिकवलं व भल्याभल्यांना घरी बसवलं. या काव्यपंक्तीतून आपल्या भावनेला वाट मोकळी करताना विद्यार्थ्यांनो आव्हाने स्वीकारा, सक्षम बनाल, असे प्रेरणादायी विचार डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयांमध्ये 11 महिन्यानंतरच्या कालखंडानंतर ऑनलाईन मधून ऑफलाइन पद्धतीने महाविद्यालयाची दार उघडली आणि सर्वत्र चैतन्य निर्माण झाले. याप्रसंगी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया म्हणाले की या कालावधीमध्ये पन्नास कविता लिहिल्या. या कवितांमधून समाजाचे निरीक्षण मांडण्याचा प्रयत्न केला. कोणी सोबत काम करावं हा परंपरेने चालत आलेला पायंडा मोडला. कामामध्ये व्यावसायिकता आली. प्रत्येक जण पडेल ते काम करू लागला. या कोरोना ने बरच काही शिकवलं, मात्र भल्याभल्यांना घरी बसवलं. जरी न भूतो ना भविष्य असलं तरी आलेल्या संकटाने जगण्यामध्ये सक्षमता, कणखरपणा, ताठरपणा आणला. तरुणांनी आव्हाने स्वीकारून सक्षम बनावे. स्वतःच्या आत्मविश्वासाबरोबरच समाजाचे आत्मपरीक्षण करून परोपकार, दयाभाव दाखवून प्रत्येकाने प्रत्येकाशी सामंजस्याने वागावे. त्याच बरोबर कोरोना संकटाचा भार हलका झाला असला तरी गाफील राहू नका, काळजी घ्या. आपल्या स्वतः बरोबर कुटुंब, समाज आणि देशासमोर नवा आदर्श निर्माण करा असा सल्ला दिला.

याप्रसंगी प्राचार्य सदाशिव कांबळे यांनी विद्यार्थ्यांना कोण कोणती काळजी घेणे गरजेचे आहे याची सविस्तर माहिती दिली. प्रशासकीय अधिकारी प्रा. पांडुरंग भास्कर यांनी आपल्या महाविद्यालयावर कोसळलेल्या संकटाचा उल्लेख करून प्रत्येकाने काळजी घ्यावी असा सल्ला दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजय निकम यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. स्वाती वाघ यांनी घोषणा पत्रकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाज जागृती करावी यासाठी घोषणापत्रकांची पोस्टर विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी प्रा. विभा ब्राह्मणकर, प्रा. रूपाली आगळे, प्रा. सचिन पवार, प्रा. उमेश लांडगे, प्रा. प्रशांत रोकडे आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख प्रा. सुधाकर बैसाणे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.