Lonavala news: राजमाची येथे बिबट्याच्या हल्ल्यात बकरी ठार; आदिवासी नागरिकांमध्ये घबराट
Pckhabar-राजमाची गावातील फणसराई या ठाकर वस्ती मध्ये बिबट्याने एका घरात बांधलेल्या बकरीवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यामुळे येथील आदिवासींमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
सोमवारी रात्री ९.३० वाजल्याच्या सुमारास संतोष वीर नावाच्या आदिवासी व्यक्तीच्या राहत्या झोपडीत वरील प्रकार घडला. संतोष वीर याने रात्री झोपताना त्याची बकरी आणि तिची दोन नवजात पिल्लं त्याच्या राहत्या झोपडी वजा घरातच बांधून ठेवली होती. पण संतोष वीर आणि त्याचे कुटुंब झोपेत असताना अचानक एक बिबट्या त्यांच्या झोपडीत शिरला आणि त्याने बांधलेल्या बकरीवर हल्ला केला. त्यावेळी बाजूला झोपलेल्या संतोष वीर आणि त्याच्या कुटुंबाला जाग आली आणि त्यांनी आरडाओरडा केली. यामुळे बिबट्याने सदर बकरीला तेथेच सोडून धूम ठोकली. मात्र तत्पूर्वी त्याच्या हल्ल्यात बकरीचा मृत्यू झाला होता.
राजमाची किल्ला परिसरात फणसराई ही साधारण ८ ते ९ घर वजा झोपड्यांची आदिवासी वस्ती असून ठाकर जमातीचे २५ ते ३० लोक याठिकाणी रहातात. काही महिन्यांपूर्वी झालेल्या निसर्ग चक्री वादळात येथील आदिवासींच्या घरांचे मोठे नुकसान झालेलं. तीन ते चार झोपडया तर पुर्णतः नामशेष झाल्या होत्या. सरकारकडून मिळालेल्या तुटपुंज्या मदतीच्या जोरावर या आदिवासींनी आपल्या झोपडीत पुन्हा उभारण्याचे काम सुरू केलं आहे. मात्र या घरावर आद्यपी छप्पर पडले नसल्याने सर्व घरं सताड उघडी पडलेली आहे. त्यातच बिबट्याच्या हल्ल्यामुळे या आदिवासींमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
शासकीय नुकसान भरपाई देण्याचे वनखात्याचे आश्वासन
बिबट्याच्या हल्ल्याची खबर समजताच वनपरिक्षेत्र अधिकारी महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पी.एम.रासकर आणि वनरक्षक मयुरी धायगुडे यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बकरीचा पंचनामा करून झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधित आदिवासीला देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आले. याशिवाय रोज रात्री या भागामध्ये पेट्रोलिंग करण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली.










Leave a Reply