Pimpri news: सुमित ग्रुप ऑफ कंपनी पोलिसांना देणार मोफत रुग्णवाहिका

 

Pimpri news: सुमित ग्रुप ऑफ कंपनी पोलिसांना देणार मोफत रुग्णवाहिका

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे मंगळवारी करणार सुपूर्द
Pckhabar-अपघात झाला की पहिला फोन जातो पोलिसांना, बेवारस मृतदेह आढळला की पोलिसांनाच फोन केला जातो. पण, पोलिसांकडे रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रुग्णवाहिकेला बोलवावे लागते. यात कालावधी जातो. त्यामुळे पोलिसांची होणारी अडचण ओळखून ती दूर करण्यासाठी चिंचवड येथील सुमित ग्रुप ऑफ कंपनी सीएसआर अंतर्गत पोलिसांना  मोफत रुग्णवाहिका देणार आहे. तसेच सायबर क्राईमचा तपास, सुरक्षा याबाबतही कंपनीतर्फे पोलिसांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती कंपनीचे संचालक प्रमोद मुंगी यांनी दिली.

चिंचवड येथील सुमित हाऊस प्लॉट नंबर 64/21, d-2 येथे उद्या (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे रुग्णवाहिकांची चावी सुपूर्द केली जाणार आहे. सायबर सेलचे डॉ. संजय तुनगर,  ऍड. सुशील हिरे, नंदू फडके यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सुमित ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष प्रभाकर साळुंखे, एव्हीएसएमचे संचालक महेश इराणा, डिजिटल टास्क फोर्सचे सीएमडी रोहन न्यायाधीश उपस्थित असणार आहेत.

सुमित ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक प्रमोद मुंगी म्हणाले, ”कंपनी सुरक्षा आणि फॅसिलिटी व्यवस्थापनासाठी काम करते. शहराच्या विविध भागात अपघाताच्या घटना घडतात. अपघातग्रस्त्यांच्या मदतीसाठी पहिल्यांदा पोलीस हजर होतात. कुठेही अपघात घडला, बेवारस मृतदेह असेल. तर, पोलिसांना फोन येतो. पोलिसांना तिथे जावे लागते. त्यावेळी रुग्णवाहिकेची गरज असते. पण, रुग्णवाहिका तत्काळ उपलब्ध होत नाही. पोलिसांकडे निधी देखील नसतो”.

”पिंपरी-चिंचवड शहरासाठी नव्यानेच पोलीस आयुक्तालय सुरू झाले आहे. सुविधांची कमतरता आहे. त्यामुळे कंपनीतर्फे पोलिसांना रुग्णवाहिका देण्यात येणार आहे. त्यासोबत प्रशिक्षित दोन चालक, इंधनाचा खर्चही कंपनीतर्फे दिला जाणार आहे. ही सुविधा चोवीस तास सुरू असणार आहे. रुग्णवाहिकेवर पोलिसांचाच संपर्क क्रमांक दिला जाईल. रुग्णवाहिकेसोबत एक पोलीस कर्मचारी देखील असणार आहे”.

”कंपनीची ग्लोबल एज्युकेशन फाउंडेशन ही संस्था आहे. त्यांच्यामार्फत सायबर सुरक्षेबाबत पोलिसांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. पोलीस, उद्योजक, विद्यार्थी, वकील यांचाही समावेश आहे. अनेकदा घटनास्थळी पंचनामा कसा करावा  यावरून संभ्रम असतो. हे प्रशिक्षण देखील पोलिसांना कुणाल प्लाझा येथे मोफत देण्यात येणार आहे. विद्यार्थी, उद्योजकाची ऑनलाईन फसवणूक झाल्यास तक्रार कशी करायची, काय काळजी घेतली पाहिजे. याबाबत माहिती नसते. वकिलांना देखील सायबर फसवणुकीच्या केस लढवीताना अडचणी येतात, कायद्यांची जाण नसते. याबाबतची सर्व माहिती प्रशिक्षणात देण्यात येणार असल्याचे” प्रमोद मुंगी यांनी सांगितले.

”सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, त्याबद्दल जागरूकता  निर्माण करणे गरजेचे आहे. Forensic आणि Cyber Law मध्ये शिक्षण देणारी डिजिटल टास्क फोर्स ही पहिली संस्था आहे. विद्यार्थ्याना शिक्षण घेतल्यावर भरपूर करिअरच्या संधी पण उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी विविध कंपन्याशी करार करण्यात आला आहे”, असे रोहन न्यायाधीश यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *