Bhosari news: बोगस कोविड सेंटरची बिले अदा करू नका :  माजी आमदार विलास लांडे

 

Bhosari news: बोगस कोविड सेंटरची बिले अदा करू नका :  माजी आमदार विलास लांडे
स्पर्श रूग्णालयाच्या डॉ. हळकुंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा
Pckhabar-दोन कोविड सेंटरमध्ये एकाही रूग्णावर उपचार न करताही सव्वापाच कोटी रूपयांची बिले स्पर्श रूग्णालयाने सादर केली आहेत. रूग्णालयाला एकाही रूपया न देता रूग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल हळकुंदे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.

याबाबत माजी आमदार लांडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, कोरोना कालावधीत रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स येथे दोन कोविड सेंटर सुरू करण्यात आली. मात्र, येथे एकही रूग्ण दाखल करण्यात आला नाही अथवा येथे कोणावरही उपचार करण्यात आले नाहीत. त्यानंतरही ही कोविड सेंटर चालविणार्‍या स्पर्श रूग्णालयाचे कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल हळकुंदे यांनी तब्बल 5 कोटी 26 लाख 60 हजार 800 रूपयांची बिले महापालिकेला सादर केली आहेत. मात्र, या सेंटरसाठी महापालिकेने कोणताही करार केला नाही. एकाही रूग्णावर उपचार नाही, त्यानंतरही बिल मागण्यात येत असेल तर ही महापालिकेची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप लांडे यांनी केला आहे.

या दोन्ही कोविड सेंटरमध्ये एकाही रूग्णावर उपचार केले ऩसताना डॉ. हळकुंदे यांनी महापालिकेला बिले सादर करण्याचे धाडस केले, यामध्ये  पालिकेच्या अधिकार्‍यांचाही सहभाग दिसून येत आहे. त्यामुळे अशा सर्व अधिकार्‍यांची चौकशी करावी, अशी मागणी लांडे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *