Pimpri Culture program news: येत्या शनिवार, रविवारी  रंगणार ‘स्वरसागर महोत्सव’

Pimpri Culture program news: येत्या शनिवार, रविवारी  रंगणार स्वरसागर महोत्सव
Pckhabar- पिंपरी-चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित स्वरसागर महोत्सव येत्या शनिवारपासून रंगणार आहे. यंदाच्या या 22 व्या स्वरसागर महोत्सवात आवडत्या कलाकारांचे गायन, वादन आपण पुन्हा एकदा मनात, कानात साठवून ठेवू शकणार आहोत. यंदाचे विशेष आकर्षण म्हणजे या वेळचा स्वरसागर महोत्सव आर्य संगीत प्रसारक मंडळीच्या साथीने रंगणार आहे आणि यात स्वरभास्करांना सांगितिक मानवंदना देण्यात येणार आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून या महोत्सवात त्यांना विशेष स्वरमानवंदना देण्यात येणार आहे.  
या वेळच्या 22 व्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी म्हणजे 6 फेब्रुवारी आणि रविवारी 7 फेब्रुवारीला पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी, 6 फेब्रुवारी रोजी नृत्यकला मंदिरचे कलाकार नमो नटराजा या कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात करतील. त्यानंतर भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे सुपुत्र आणि शिष्य श्रीनिवास जोशी आणि पंडितजींचे नातू विराज जोशी यांचे गायन होईल. पुढील सत्रात ज्येष्ठ गायक संगीतमार्तंड पंडित जसराज यांचे पट्टशिष्य पंडित संजीव अभ्यंकर यांचे गायन होईल.  
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य निनाद अधिकारी हे संतूरवादन सादर करतील. त्यानंतर सुधाकर चव्हाण यांचे शास्त्रीय गायन होईल. पुढील सत्रात भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य आनंदगंधर्व म्हणजेच आनंद भाटे यांचे शास्त्रीय गायन होईल. आणि महोत्सवाचा समारोप पद्मश्री उस्ताद शाहिद परवेझखान यांच्या सतार वादनाने होईल. या सर्व कलाकारांना संवादिनीसाथ राजीव परांजपे, गंगाधर शिंदे, अभिनव रवांदे आणि प्रभाकर पांडव करतील. तसेच तबलासाथ पंडित मुकेश जाधव, रवींद्र यावगल, पांडुरंग पवार, रोहित मुजुमदार, शंतनू देशमुख आणि नंदकिशोर ढोरे करणार आहेत.  
पिंपरी चिंचवडमधील संगीत रसिकांच्या मर्मबंधातील ठेव असलेल्या स्वरसागर महोत्सवाचे यंदाचे 22 वे वर्ष आहे. ज्या आतुरतेने पुणेकर रसिक सवाई गंधर्व महोत्सवाची वाट पाहात असतात त्याच आतुरतेने पिंपरी चिंचवडचे रसिक स्वरसागर महोत्सवाची वाट पाहात असतात. या स्वरसागर महोत्सव समितीचे अध्यक्ष अनिल गालिंदे असून सहसमन्वयक प्रशांत पाटील आणि संजय कांबळे आहेत. शरयूनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत तुपे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. या महोत्सवाला प्रवेश विनामूल्य असून काही जागा राखीव आहेत.
मागील 21 वर्षांपासून शहरात सुरु असलेला स्वरसागर महोत्सव ही आपली सांस्कृतिक परंपरा आहे. येथे अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा देखील अनेक नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. त्यामुळे स्वरसागर महोत्सवाला येऊन कलाकारांना भरभरुन दाद द्या असे आवाहन यानिमित्ताने महोत्सवाचे मुख्य समन्वयक प्रवीण तुपे यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *