Maval news : पोल्ट्री उत्पादक शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : माऊली दाभाडे
Pckhabar-मावळ तालुक्यात बर्ड फ्ल्यूची लागण झालेली असून पोल्ट्री उत्पादक शेतकरीवर्गामध्ये भितीचे वातावरण तयार होत आहे. शेतक-याने न घाबरता व न डगमगता आप आपल्या पोल्ट्री शेडची व्यवस्थित काळजी घ्यावी, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन मावळ अॅग्रोचे संस्थापक ज्ञानेश्वर तथा माऊली दाभाडे यांनी केले.
‘ बर्ड फ्ल्यूच्या ‘ पार्श्वभूमीवर मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेची विशेष सभा आज (रविवार)रोजी आंबी येथील शिवसोनाई मंगल कार्यालयात झाली. त्याप्रसंगी दाभाडे बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, मावळ अॅग्रोचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी, माजी सरपंच शिवाजी पवार, ज्ञानेश्वर मांडेकर, बंडोबा मालपोटे, कैलास पवार, प्रकाश घुलेसह पोल्ट्री धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दाभाडे पुढे बोलताना म्हणाले की, मावळ तालुक्यात गेली 20 वर्षे पोल्ट्री व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून करीत आहेत. आतापर्यंत दोन वेळा ‘बर्ड फ्ल्यू ‘ हा साथीचा रोग मावळ तालुक्यात येऊन गेलेला आहे. त्यावेळी पोल्ट्री धारकांनी न डगमगता मोठ्या धिराने या संकटाचा यशस्वी सामना केला होता. तसाच सामना करण्यासाठी आपण आता सज्ज व्हावे असे प्रतिपादन दाभाडे यांनी केले. तसेच आपल्या शेडमधील पक्षांना गरजेचे लसीकरण करावे, बाहेरच्या व्यक्तींना आपल्या पोल्ट्री शेडमध्ये प्रवेश देऊ नये, शेडच्या प्रवेशद्वारापाशी ” फूटबाथ ” ठेवावा. शेडच्या सर्व बाजूंनी फार्मालिनची अर्थात निर्जंतुकिकरण फवारणी करावी. कंपनी व्यवस्थापन सांगेल त्याप्रमाणे उपचार व काळजी घ्यावी. दररोजची मर विशिष्ट आकाराच्या खड्ड्यात टाकून त्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. आपली आपणच काळजी घ्यावी. अडचण भासल्यास शासकीय पशुसंवर्धन विभाग तसेच मावळ अॅग्रोकडे संपर्क करावा. अशा मार्गदर्शक सूचना मावळ अॅग्रोचे संस्थापक माऊली दाभाडे यांनी यावेळी केल्या.
यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर म्हणाले की, बर्ड फ्ल्यूच्या माध्यमातून आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी शेतकरी वर्गाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. जिल्हा परिषद व शासन त्यांना आर्थिक मदतीसाठी त्यांच्या पाठीशी उभी राहील अशी ग्वाही वायकर यांनी दिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोल्ट्री उत्पादक संभाजी केदारी, संदीप मालपोटे, विनायक बधाले, रामनाथ घोजगे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संघटक गोपाळे गुरूजी यांनी मानले.










Leave a Reply