पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय 63) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृद्यविकारचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्वात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लॅस्टिकमुक्ती,पर्यावरण,पवना नदी सुधार,पर्यावरणपूरक गणेशोत्सव,कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना याकरिता त्यांनी मोलाचे कार्य केलेले आहे. त्यांचे संस्थेमार्फत शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी मोफत लॅपटॉप वाटप देखील केले होते. पालिकेच्या निवडणुका,राष्ट्रीय कार्यक्रम, पर्यावरणपूरक गणेशोत्सव, वृक्षसंवर्धन यासारख्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून नुकतीच पत्रकारितेची पदवी देखील घेतली होती.
विकास पाटील यांना 10 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना आयसीयू बेडची आवश्यकता असल्याने तीन दिवसांपूर्वी डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्यांना हृद्यविकारचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे पर्यावरण क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.









Leave a Reply