Lonavala news: ‘तुम्ही नोटीसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढतो’

 

Lonavala news: ‘तुम्ही नोटीसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढतो’
Pckhabar- “टपरीधारक, व्यापाऱ्यांना अतिक्रमणांच्या नोटिसा बजावण्यात आल्या, जो विरोध करतो, त्याला नोटिसा बजावण्यात येतात, तुम्ही नोटिसा काढा, मी तुमच्या भ्रष्टाचाराच्या फायली काढतो,” असा धमकी वजा इशारा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी सत्ताधारी भाजपला दिला.

लोणावळा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आमदार शेळके बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, प्रांतिक सदस्य बाळासाहेब पायगुडे, नगरसेवक राजू बच्चे, लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, नंदूशेठ वाळंज, गणेश खांडगे, सुवर्णा राऊत, मंजू वाघ, विठ्ठलराव शिंदे, राजू बोराटी, भूषण पाळेकर, सोमनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.

”जनतेचा पैसा कोणालाही चुकत नाही, लोणावळा नगरपालिकेत ज्यांनी उपद्‌व्याप केलेत, त्यांना मी सोडणार नाही, असा इशारा देत सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या फायली बाहेर काढत सहा महिन्यांत रिझल्ट देऊ,” असेही शेळके म्हणाले.

लोणावळ्याचा विकास साधायचा असेल, तर राष्ट्रवादीच्या हाती नगरपालिकेची सत्ता आली पाहिजे, यासाठी सर्व सेलच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर एकजुटीने काम करत संघटना मजबूत करण्याची गरज जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी व्यक्त केली.

लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड यांनी प्रास्तविक केले. बाळासाहेब पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. भूषण पाळेकर यांनी आभार मानले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *