Pimpri news:  कोरोना नियमावलीचे पालन करून  शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन करा : महापौर

Pimpri news:  कोरोना नियमावलीचे पालन करून  शिवजयंती कार्यक्रमाचे नियोजन करा : महापौर

Pckhabar- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका नेहमीच प्रयत्नशील असते.  शासनाच्या कोवीड-१९ संदर्भातील नियमावलीचे पालन करून या वर्षी शिवजयंतीचे कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यासाठी महापालिका प्रभावी नियोजन करेल असे महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी सांगितले.  शहरातील शिवरायांच्या पुतळ्याची रंगरंगोटी, त्या ठिकाणची स्थापत्य, विद्युत आणि सुशोभिकरणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौरांनी प्रशासनाला दिले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महानगरपालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात येत असते.  त्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी शहरातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत आज  

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. 

          या बैठकीस उपमहापौर केशव घोळवे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, पक्षनेते नामदेव ढाके, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्य माऊली थोरात, नगरसदस्या आरती चोंधे, झामाबाई बारणे, निर्मला कुटे, माजी नगरसदस्य मारुती भापकर, अंकुश कानडी, अतिरिक्त आयुक्त अजित पवार, क्रीडा विभागाचे उप आयुक्त संदीप खोत, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, आरोग्य कार्यकारी अधिकारी विनोद बेंडाळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे आदींसह वंचित बहुजन आघाडीचे देवेंद्र तायडे, प्रविण ढसाळ, संतोष जोगदंड, मराठा सेवा संघाचे भरत रणसिंग, शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे, निलेश शिंदे, सागर तापकीर, नकुल भोईर, शिवस्मारक प्रतिष्ठानचे सुरेंद्र पासलकर, छावा संघटनेचे धनाजी पाटील राजेंद्र चेडे, बारा बलुतेदार महासंघाचे विशाल जाधव, भारतीय लहुजी पँथरचे युवराज दाखले, सचिन लिमकर, जनकल्याण प्रतिष्ठानचे अजय पाताडे आदी उपस्थित होते.

          बैठकीत उपस्थित प्रतिनिधींनी शिवजयंती विचार प्रबोधन पर्वाच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या.  शालेय स्तरावर शिवरायांच्या विचारावर आधारित निबंध, वक्तृत्व स्पर्धांचे वेळेत नियोजन करावे, शिवकार्याचा प्रचार प्रसार करणा-या व्यक्तींचा सत्कार करण्यात यावा, जास्तीत जास्त माध्यमांचा वापर करून या जयंती कार्यक्रमांची प्रसिध्दी करावी, आदी सूचना करण्यात आल्या.

            महापालिकेने कोरोना काळात विकासापेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी केली.  नागरिकांच्या सहकार्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपण ब-यापैकी यशस्वी झालो.  कोरोना काळात अनेक कार्यक्रम घेण्यास देखील मर्यादा आल्या.  शिवजयंतीचा कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यासाठी महापालिका चांगले नियोजन करणार आहे.  शासनाच्या कोरोना संदर्भात असलेल्या विविध सूचना आणि नियमांची अंमलबजावणी करून शिवजयंतीचे विचार प्रबोधन पर्व साजरे केले जाईल असे महापौर माई ढोरे यांनी सांगितले.

पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले, शिवरायांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी महापालिका विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करीत असते.  शासनाच्या कोरोना संदर्भातील नियमावली विचारात घेऊन यावर्षीचा विचार प्रबोधन पर्वाचा कार्यक्रम निश्चितपणे आयोजित केला जाईल.  तसेच प्रबोधन पर्वासाठी महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *