Bhosari news: आदिवासी समाजाला दिले जाणारे अनुदान आघाडी सरकारने बंद केले:  विरोधी पक्षनेते फडणवीस

 

Bhosari news: आदिवासी समाजाला दिले जाणारे अनुदान आघाडी सरकारने बंद केले:  विरोधी पक्षनेते फडणवीस
Pckhabar- भाजप सरकारच्या काळात आदिवासी समाजासाठी मोठे काम करण्यात आले. समाजावरील 175 कोटींचे खावटी कर्ज माफ करण्यात आले. पेसा अंतर्गत आदिवासी समाजाला थेट पद्धतीने अनुदान देण्यास सुरुवात केली. मात्र, आम्ही घेतलेले निर्णय या सरकारने बंद केले. हा अधिकार त्यांना कोणी दिला, या सरकारला फक्त खरेदीत रस आहे. थेट अनुदान नाकारून आदिवासी समाजासाठी वस्तू खरेदीचा घाट सरकारने घातला असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पिंपरी-चिंचवड शहर भाजपतर्फे अनुसूचित जमाती, आदिवासी मोर्चाच्या वतीने शुक्रवारी प्रदेश पदाधिकारी, कार्य समिती बैठक, मेळाव्याचे  भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात आयोजन केले होते. याप्रसंगी फडणवीस बोलत होते. महापौर उषा ढोरे, भाजपा प्रदेश प्रभारी ओमप्रकाश धुर्वे, माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक, भाजपा प्रदेश महामंत्री श्रीकांत भारतीय, प्रदेश सचिव अमित गोरखे, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेशाध्यक्ष आमदार डॉ. अशोक ऊईके, खा. डॉ. भारती पवार, खासदार अशोक नेते, सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, एकनाथ पवार आदी उपस्थित होते.

आदिवासी समाजाच्या योजना ठप्प आहेत. सरकारमधील तीनही पक्ष तीन वेगवेगळ्या दिशेला चालले आहेत. त्यामुळे राज्याची अवस्था वाईट झाली आहे, असे सांगत फडणवीस म्हणाले, तीन पक्ष एकत्र आले असले तरी घाबरायचे नाही. कारण, त्यांना बसायला जागा नाही. दोन सोफे ठेवले आहेत. एका सोफ्यावर तीन लोक बसायचे आहेत. आपण बसायला एकटे आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे. राज्य सरकारला खरेदीचा शौक असल्याने तांत्रिक समितीने मान्यता दिल्यानंतरही आदिवासी समाजातील नागरिकांच्या थेट खात्यात अनुदान दिले जात नाहीत. कारण, खरेदीत माल मिळतो. कोणाला किती माल मिळेल यावरून सरकारमधील तीन पक्षामध्ये भांडणे आहेत. या भांडणात आदिवासी समाज विविध योजनांपासून वंचित राहत असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला. यावेळी तीनही ठराव पारित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *