मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे कोविडच्या चाचण्या वाढवा

पिंपरी ः वेळीच निदान आणि तत्काळ उपचार मिळाल्यास कोरोनाची परिस्थित नियंत्रणात येईल. कोरोना संशयितांच्या चाचण्या जलद होणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील कोरोना संशयितांच्या मोबाईल अ‍ॅब्युलन्सद्वारे चाचण्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. जेणेकरुन निदान लवकर होईल. बाधितांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.
याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात नगरसेवक नायर यांनी म्हटले आहे की, पालिकेच्या 32 प्रभागात तातडीने कोविड तपासणी सेंटर सुरु करावे. त्यासाठी खासगी रुग्णालये, डॉक्टरांची मदत घ्यावी. रुग्णालयामध्ये ऑक्सीजन नसेल तर तिथे उपचार घेणार्‍या रुग्णांची प्रकृती खालावत आहे. त्यासाठी पालिका, खासगी रुग्णालयातील ऑक्सीजन मशीनचे प्रमाण वाढविण्यात यावे. रुग्णाला वेळीच ऑक्सीजन मिळाल्यास मृत्यूचे प्रमाण कमी होईल. आठ क्षेत्रीय कार्यालयात मोबाईल अ‍ॅम्ब्युलन्सद्वारे चाचण्या कराव्यात. प्रत्येक कार्यालयाला चार अ‍ॅम्ब्युलन्स देण्यात याव्यात. त्या माध्यमातून दररोज रुग्ण तपासणी करण्यात यावी. झोपडपट्टीमधील नागरिकांच्या तपासणीला प्राधान्य द्यावे. तसेच एखाद्याला कोविडची तपासणी करायची असेल तर ती कुठे करायची, याची माहिती देण्यात यावी. त्याची माहिती कुठे मिळेल. हेल्पलाईन आहे का, याची माहिती प्रसिद्ध करावी. महापालिकेचे अनेक डॉक्टर, कर्मचारी, पोलिसांचे काम प्रशंसनीय आहे. कोरोनाच्या काळात विविध सामाजिक संस्थांनी मोठी मदत केली आहे. यापुढेही मदत कार्य सुरुच ठेवावे, असे आवाहनही नायर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *