Pimpri News: ‘आज सुनियाचा दिन’ ; शहरातील आठ रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात

Pimpri News: ‘आज सुनियाचा दिन’ ; शहरातील आठ रुग्णालयात लसीकरणाला सुरुवात

आज 800 जणांना टोचविणार लस

Pckhabar- गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा असलेल्या कोरोना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे ‘आज सुनियाचा दिन’ असेच म्हणावे लागेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठ रुग्णालयामध्ये आजपासून कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दिवसभरात वैद्यकीय क्षेत्रातील 800 जणांना लस टोचविण्यात येणार आहे. तर, दुसरा डोस एक महिन्याने देण्यात येणार आहे.

पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना लस टोचवून लसीकरणाची सुरुवात झाली. महापौर उषा ढोरे, खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरुवात झाली. उपमहापौर केशव घोळवे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीत तिरुमणी, डॉ. बाळासाहेब होडगर यावेळी उपस्थित होते.

महापालिकेच्या यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय या 8 केंद्रावर लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

लस टोचविल्यानंतर त्यांना अर्धा तासासाठी निरीक्षक कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात येते. कोणताही त्रास होत नसल्यास घरी सोडले जाते. महापालिकेला 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. पहिल्या टप्यात वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लस टोचविण्यात येणार आहे. महापालिका, खासगी रुग्णालयातील अशा 17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची महापालिकेकडे नोंदणी झालेली आहे, अशी माहिती सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *