
Lonavala news: पोल्ट्री व्यावसायिकांना सरकारने मदत करावी- देवेंद्र फडणवीस
Pckhabar- बर्ड फ्लू हा रोग पाच राज्यात पसरला असून महाराष्ट्रात देखील काही भागात लागण सुरू झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात व्यावसाय बंद राहिल्याने पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आलेले असताना आता पुन्हा बर्ड फ्लूचे संकट आले आहे. या व्यावसायिकांना शासनाने मदत करणे गरजेचे आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला मोर्चा कार्यसमिती बैठकीच्या समारोप सत्राला देवेंद्र फडणवीस प्रमुख वक्ते म्हणून लोणावळ्यात आले होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणार्या नथुराम गोडसे यांचे समर्थन या देशात कोणीही करू शकणार नाही.
भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नवजात बालकांच्या आग्नितांडवावर बोलताना सरकार अतिशय असंवेदनशीलपणे वागत असल्याची टीका करत फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री त्याठिकाणी जाऊन आले पण कुटुंबांना कोणतीही वाढीव मदत नाही की कोणावर कारवाई देखील केली नाही. मागील सरकारने काय केले, केंद्र सरकार काय करतंय हे म्हणत बसण्यापेक्षा संवेदनशिलतेने वागून कारवाई करावी अशी मागणी फडणवीस यांनी केली .
कार्यसमितीच्या बैठकीत महिलांना मार्गदर्शन करताना फडणवीस म्हणाले राजकारणात महिलांचा वाढता सहभाग पक्ष वाढीसाठी महत्वाचा आहे. सध्या महिलांना काम करण्यासाठी मोठी संधी आहे. तसेच आपले सर्व विरोधक एकत्र आल्याने त्यांची राजकीय स्पेस कमी झाली असून आपली वाढली असल्याने महिला मोर्चा व युवा मोर्चाने सक्रिय व्हावे असे आवाहन केले. यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार विद्या ठाकूर, माधवी नाईक, कांता नलावडे, स्मिता वाघ, निता केळकर, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, दिपाली मोकाशी, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे , तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, नगरसेवक देविदास कडू, विशाल पाडाळे, बिंदा गणात्रा, रचना सिनकर , मंदा सोनवणे, महिलाध्यक्षा सायली बोत्रे, योगिता कोकरे, शुभम मानकामे, सुनिल तावरे आदि मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply