Pimpri crime news: घरगुती गॅसचा काळा बाजार ; 77 लाखांचा मुद्देमाल जप्त
Pckhabar- घरगुती गॅसची चोरी करुन काळ्या बाजारात विक्री करणार्यांवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कारवाई केली आहे. दोन ठिकाणी केलेल्या या कारवाईत तब्बल 77 लाख 40 हजार 771 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 19 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सामाजिक सुरक्षा विभागाची पहिली कारवाई चिंबळी, ता. खेड याठिकाणी करण्यात आली. याप्रकरणी दुकान मालक विलास भगवान खोडे (शिंदे) (वय 42, रा. चिंबळी गावठाण, ता.खेड), टेम्पो चालक सतिश मनोहर परबत (वय 35, रा. चिंबळी चौक, ता. खेड), स्वयंभू गॅस एजन्सीचे मालक रविंद्र सातकर (रा. ता. खेड) यांच्या विरूद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घरगुती गॅसची चोरी करुन तो सिलेंडरमध्ये भरुन साठवणुक करून विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने आळंदी परिसरात सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 7 हजार रुपये रोख रक्कम, सात लाख 10 हजार किंमतीचा चारचाकी टेम्पो, 4 लाख 55 हजार 226 रूपयांच्या गॅसच्या 153 रिकाम्या टाक्या, 126 गॅसने भरलेल्या टाक्या असा एकूण 11 लाख 72 हजार 366 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.
पथकाची दुसरी कारवाई इंदोरी टोलनाक्याजवळील येलवाडी या ठिकाणी करण्यात आली. याप्रकरणी रुपेश रामदुलार गौड (वय 25, रा. चेंबुर, मुंबई), मुख्य वितरक दिनेशकुमार लेखरात विष्णोई (वय 30, रा. येलवाडी, देहू, मुळगाव जोधपूर , राजस्थान) तसेच त्यांचे इतर 15 साथीदार यांच्या विरुध्द म्हाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एचपी कंपनीच्या 15 टन कॅप्सूलमध्ये गॅस भरून गॅसची चोरी करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने येलवाडी परिसरात सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 60 लाख 96 हजार किंमतीचा भरलेला कॅप्सूल गॅस टँकर, 25 लाख 85 हजार किंमतीचा एक टेम्पो, महिंद्रा पिकअप, दोन बोलेरो पिकअप, चार पे, दोन छोटा हत्ती व वॅगनार अशी एकूण 10 वाहने तसेच, तीन लाख 15 हजार किंमतीच्या 184 रिकाम्या गॅस टाक्या, 1 लाख 16 हजार 030 रोख रक्कम, 1 लाख 88 हजार 700 रूपयांचे 18 मोबाईल, 12 हजार 135 रूपयांचे इलेक्ट्रीक वजन काटे व पाईप कनेक्टर असा एकूण 65 लाख 68 हजार 365 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.











Leave a Reply