Pimpri news: ’वारकरी संप्रदायाने समाज प्रबोधनाची चळवळ अखंड तेवत ठेवावी’: महापौर
Pckhabar-प्रगतीशील समाज निर्माण व्हावा याकरिता युवकांची भावना सकारात्मक होणे आवश्यक असून त्याकरिता प्रबोधनाची नितांत आवश्यकता आहे. वारकरी संप्रदायाने किर्तन आणि प्रवचनाच्या माध्यमातून ही समाज प्रबोधनाची चळवळ अखंड तेवत ठेवली आहे असे मत महापौर उषा ढोरे यांनी व्यक्त केले.

कोविड-19 च्या संकटकाळात पिंपरी चिंचवड महापालिका आणि शहर पोलिस दलाने उत्कृष्टपणे आपली जबाबदारी पार पाडली. तसेच कार्तिक मासामध्ये वारकरी मंडळांच्या वतीने आयोजिलेल्या विविध उपक्रमांना महापालिका आणि पोलीस दलाने विशेष सहकार्य केले. यामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश आणि पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी प्रमुख भूमिका बजावली. त्यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. महापौर ढोरे यांच्या हस्ते मानपत्र, शाल,पगडी, संत तुकाराम महाराज गाथा व ज्ञानेश्वरी ग्रंथ, वीणा, मृदुंग, टाळ-चिपळ्या देऊन हा सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये संपन्न झालेल्या या सन्मान सोहळ्यामध्ये शहरातील विविध भजनी मंडळे आणि वारकर्यांचा देखील सत्कार करण्यात आला. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर आदींसह वारकरी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार गीता गायकवाड, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष ह.भ.प. कृष्णाजी रांजणे महाराज, जीवन मामा खाणेकर, महावीर महाराज सूर्यवंशी, चंद्रकांत महाराज वांजळे, संतोष महाराज पायगुडे, जालिंदर महाराज काळोखे, सतीश महाराज काळजे, विजुभाऊ भोंडवे, शिवानंद स्वामी, तुकाराम भाऊ, बबृवाहन महाराज वाघ, विनोद शेठ म्हाळुंगकर पाटील, युवराज शिंदे, विकास परदेशी, युवा उद्योजक केदार भेगडे, आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे. सत्कारार्थी भजनी मंडळांची नावे:- विठ्ठल भजनी मंडळ (वरचीआळी दापोडी), हनुमान भजनी मंडळ, (आकुर्डी), विठ्ठल भजनी मंडळ समस्त ग्रामस्थ (पिंपळेगुरव), विठ्ठल रुक्मिणी पूजापाठ मंडळ (एच.ए.कॉलनी, पिंपरी), भोलेश्वर प्रतिष्ठान (चिंचवडेनगर, चिंचवड), वैष्णव विचार किर्तन संस्था (भोसरी), खंडोबा प्रतिष्ठान (निगडी) यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ब प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर यांनी तर सूत्रसंचालन माजी नगरसेवक जयंत बागल यांनी केले. ह.भ.प.माऊली महाराज आढाव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप ह.भ.प. रामलिंग महाराज मोहिते यांनी पसायदानाने केला.










Leave a Reply