Dehu Article: ग्रामपंचायत सदस्यांना नगरसेवक होण्याचे वेध!
Pckhabar- अनेक वर्षांपासून मागणी होत असलेल्या देहूगाव ग्रामपंचायतीचे रुपांतर 8 डिसेंबर रोजी नगरपंचायतीमध्ये झाले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना आता नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. तसेच नगरपरिषदेचा पहिला नगरसेवक होण्याची अनेकांची इच्छा आहे. त्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
तीर्थक्षेत्र देहूगावचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी होत होती. तसा ठराव देखील महासभेत झाला होता. मात्र, याला देहूगावकरांनी तीव्र विरोध केला होता. तीर्थक्षेत्र देहूगावची सुमारे 35 हजार लोकसंख्या आहे. वाढती लोकसंख्या आणि श्री संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी व कर्मभूमी असल्याने महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त येतात. नागरी सुविधांचा विचार करता ग्रामपंचायतची नगरपंचायतींमध्ये रुपांतर करण्याची मागणी केली जात होती. या मागणीचा विचार करता मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केल्याने देहूगाव नगरपंचायतचा निर्णय झाला.
सद्या नगरपंचायतवर मावळचे तहसीलदार मधुसुदन बर्गे हे प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. प्रशासक बर्गे यांची नेमणूक करण्यात आली असली. तरी, कधीही देहूगाव नगरपंचायतची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. देहूगावाचे नगर झाल्याने अनेकांना पहिला नगरसेवक व्हायचे आहे. अनेक इच्छुक आपल्या भागातील लग्न सोहळ्यासह विविध कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. तसेच सोशल मीडियावरही सक्रिय झाले आहेत.
महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार?
यापुर्वी देहू ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. ग्रामपंचायत निवडणूक ही पॅनेल करून लढवली जाते. मात्र, आता देहूत नगरपंचायत झाल्याने ही निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होणार आहे. राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणूकीत तीन पक्ष एकत्र येतात की स्वतंत्र निवडणूक लढवतात, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेनेचे श्रीरंग बारणे खासदार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके आमदार आहेत.
शिवसेनेच्या शैला खंडागळे जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हेमलता काळोखे हवेली पंचायत समितीत निवडणून आल्या आहेत. त्यांनी पंचायत समितीचे सभापतीपद देखील भूषविले आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चांगली ताकद आहे. तर, देहूगावात भारतीय जनता पक्षाचेही चांगले प्राबल्य आहे. भाजपही एकहाती सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply