Talegaon Dabhade news: तळेगावातील डॉ.आंबेडकर यांच्या निवासस्थानाच्या सुशोभिकरणासाठी 1 कोटी 11 लाखांचा निधी
Pckhabar- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याच्या स्मृती जतन करणाऱ्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील निवासस्थानाच्या दुरुस्ती, सुशोभिकरण, पुनरुज्जीवन आणि संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 1 कोटी 11 लाख 76 हजार रुपये निधी मिळाला असल्याची माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली. या ऐतिहासिक वास्तूच्या कामास आज शुक्रवारी प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.
डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक प्रसंगाच्या या वास्तू साक्षीदार आहेत. बाबासाहेबांनी तथागत गौतम बुद्धांच्या प्रज्ञा,शिल, करुणेचा मार्ग आजच्या दिवशीच स्वीकारुन देहूरोड येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापन केली. आणि या जगाला समता, न्याय, बंधुत्व या जीवनमूल्यांची शिकवण दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या या निवासस्थानाच्या विकासासाठी समितीने आजपर्यंत मोठे प्रयत्न केले आहेत. आणि या प्रयत्नांना आज यश मिळाले आहे. या वास्तूचे प्रेरणादायी स्मारकात रुपांतर व्हावे, यासाठी येथे चांगल्या दर्जाचे संग्रहालय उभारण्यात येणार यावे. हे निवासस्थान येणाऱ्या पिढीसाठी ऊर्जास्त्रोत ठरणार आहे. त्यादृष्टीने या वास्तूचे जतन केले गेले पाहिजे. या स्थळाला जगभरातून लोक भेट देण्यासाठी येतील आणि येथून न्याय, हक्कासाठी, समाजासाठी लढण्याची प्रेरणा घेऊन जातील. आणि बाबासाहेबांच्या स्मृती जोपासल्या जातील अशी अपेक्षा आमदार शेळके यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रम प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद उपनगराध्यक्षा वैशालीताई दाभाडे, नगरसेवक अरुण माने, नगरसेविका संगीताकाकी शेळके, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव दाभाडे अध्यक्ष ॲड. रंजनाताई भोसले, उपाध्यक्ष एल.डी.कांबळे, सचिव किसन थुल, सहदेव डोंबे, दिनेश गवई, संजय गायकवाड, देवानंद बनसोडे, तुकाराम मोरे, आनंद वंजारी, रोहिणीताई ओव्हाळ, माधुरीताई थूल, गंगाधर सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.










Leave a Reply