Talegaon Dabhade news : नगरपरिषदेच्या तिजोरीत खडखडाट; 25 कोटींची थकबाकी
Pckhabar- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा मालमत्ता कर मोठ्या प्रमाणात थकीत आहे. आर्थिक वर्षाच्या उर्वरित तीन महिन्यात ही वसूल करणे नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे. 35 हजार मालमत्ता धारकांकडून सुमारे 25 कोटी 71 लाख रुपयांचा कर थकीत आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कर वसुली यंत्रणा पूर्णपणे थंडावली होती. अनेक करदात्यांचे व्यवसाय ठप्प झाले काहींच्या नोकऱ्या गेल्या. त्यामुळे करदात्यांना मिळकत कर भरणे शक्य झाले नाही. 9 महिन्याच्या कालावधीत फक्त 12.9 टक्के करवसुली झालेली आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे तिजोरीत खडखडाट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आणि करनिरीक्षक विजय शहाणे यांनी वसुली यंत्रणा सक्रिय केलेली आहे.
नगर परिषद हद्दीतील 35 हजार मालमत्ता धारकांकडून 25 कोटी 71 लाख 39 हजार 978 रुपये येणे बाकी आहेत. यासाठी वसुली विभागाकडून सर्व मिळकतधारकांना वसुलीच्या नोटिसा देण्यात आल्या असून आपला कर भरणा वेळेत करा, असे आवाहन नगरपालिका प्रशासनाने केले आहे. नऊ महिन्यात तीन कोटी 79 लाख 2 हजार 304 रुपये एकत्रित कर, शिक्षणकर, रोजगार हमीकर, वृक्षकर, अग्निशमन, विशेष स्वच्छता कर उपयोगकर्ता शुल्क आदिपोटी नगर परिषदेकडे जमा झालेले आहेत.
पाणी पुरवठा विभागाला दोन कोटी 86 लाख 35 हजार पाणीपट्टीपोटी वसूल करावयाची होते. आतापर्यंत एक कोटी 20 लाख पाणीपट्टी वसूल झाली आहे. तर अद्याप एक कोटी 66 लाख रुपये वसूल करणे बाकी आहे.










Leave a Reply