Article By Dr. Ankush Jadhav; ‘एड्स अन कोरोना’
Pckhabar- जगभर आज १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिवस साजरा केला जातो. या दिवशी एड्स या रोगाविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध चर्चा सत्रांचे आयोजन केले जाते. या रोगाविषयी, त्याच्या लक्षणांविषयी माहिती दिली जाते.
एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनोडिफिशियसि सिन्ड्रोम
(Acquired Immunity Dificiency Syndrome) म्हणजेच शरीरात असलेल्या रोग प्रतिकारक शक्तीच्या अभावामुळे वा कमी झाल्यामुळे होणाऱ्या लक्षणांचा समूह. हा एचआयव्ही
(Human Immuno Dificiency Virus)या विषाणू मुळे होतो.१९८१ मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील विद्यार्थी वसतिगृहात चार आफ्रिकन विद्यार्थ्यांना व पुढच्याच आठवड्यात युगांडातील ७ विद्यार्थ्यांना एचआय व्ही. ची लक्षणे दिसून आली. १९८३ मध्ये ल्युक मोंटेनेगर या फ़्रेंच देशातील शास्त्रज्ञाने व १९८४मध्ये रॉबर्ट गलो या अमेरिकेतील शास्त्रज्ञाने एड्स च्या विषाणूंचा शोध लावला. १९८६ मध्ये या विषाणूंना ह्यूमन इम्युनोडेफियंसी व्हायरस १व २ अशी नांवे देण्यात आली.१९८६ मध्ये भारतात तामिळनाडूतील सहा वेश्यांमध्ये या रोगाची लक्षणे दिसून आली व निदानानंतर तो एड्स असल्याचे सिद्ध झाले.
एचआयव्ही हा विषाणू फक्त माणसाच्या शरीरातच वाढतो. हवेत वा मानवी शरीराबाहेर जिवंत राहू शकत नाही. असुरक्षित लैगिंक संबंध, दूषित रक्त संक्रमण, एचआयव्ही बाधीत गर्भवतीकडून गर्भास संसर्ग होणे, दूषित सुया,सिरिंज चा वापर ही या रोगाची आज ज्ञात असलेली प्रमुख कारणे आहेत. परंतु सामान्यतः असुरक्षित लैंगिक संबंधामुळेच एचआयव्ही ची बाधा/लागण होण्याची शक्यता अधिक असते.
एचआयव्ही विषाणू रोगप्रतिकारक शक्ती वरच हल्ला करतात परिणामी रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर कमी होऊन हा रोग होतो. एचआयव्ही, एड्स मध्ये रुग्णाचे वजन १०टक्के हुन अधिक कमी होणे, एक महिन्याहून जास्त काळ जुलाब होणे, एक महिन्याहून जास्त काळ ताप राहणे. अशी मुख्य लक्षणे दिसून येतात. त्याच बरोबर एक महिन्याहून अधिक काळ खोकला, त्वचेची आग होणे, वारंवार नागीण होणे,
सर्वांगाला खाज सुटणे, शरीरातील लसिका ग्रंथीची वाढ होणे (त्यांना सूज येणे), तोंड व घसा यात कॅण्डीडा बुरशीचा संसर्ग होणे इ. लक्षणे दिसून येतात.
आज जगात थैमान घातलेल्या कोरोना, कोविड-१९हा आजार शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने होतो. एड्स रोगापासूनच रोगप्रतिकारक शक्तीचे महत्व अबाधित आहे. फक्त मध्यंतरी हे विसरले गेले. आज जे कोरोनाच्या सुरवातीच्या काळात कोरोना विषयी गैरसमज व भीती होती तशीच भीती व गरसमज एड्स च्या काळात म्हणजे १९८५ ते १९९६ च्या दरम्यान होती.
एचआयव्ही, एड्स पीडित व्यक्तीला घराच्या बाहेर काढले जात होते, त्याला गावाबाहेर ठेवले जात, त्याच्याशी सर्वं प्रकारचे संबंध तोडले जात. एड्स चा रुग्ण मृत्यू पावला तर त्याला अग्नी देण्यासाठी ही जायला लोक टाळत. मध्यंतरी काही लोकांना “कोरोना फोबिया” झाला होता तसाच तेव्हा काही लोकांना “एड्स फोबिया”झाला होता. एड्स ची भीती लोकांना आज ही आहे तर कोरोना ची भीती त्यामानाने लवकर संपत आहे.
आजही जगात एचआयव्ही विषाणूंचे बाधा झालेले एकूण ३.७ कोटी लोक असून त्यापैकी ७० टक्के लोक आफ्रिका खंडातील आहेत. २०१७ मध्ये १८ लाख लोकांना विषाणूंची बाधा होऊन त्यापैकी १० लाख लोकांचा मृत्यू एचआयव्ही, एड्स संबंधित रोगांमुळे झाला. १९८२ पासून आतापर्यंत जगात एचआयव्ही,
एड्स ने ३.५ कोटीहुन अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. आज ही जगामध्ये दररोज १६०० नवीन एचआयव्ही बाधितांची भर पडते. त्यापैकी ९०टक्के व्यक्ती या तरुण व मध्यमवर्गीय असतात.
एड्स मध्ये एकच संक्रमित होतो, तर कोरोनात कुठून तरी व्यक्ती संक्रमित होते. व ती व्यक्ती १५ ते २०लोकांना संक्रमित करते. पुढे या १५, २० व्यक्तींकडून गुणाकार पद्धतीने संक्रमण वाढत जाते.
१ वर्षातच कोरोना वर लस तयार होत आहे. परंतु गेली ४० वर्षे असलेल्या एड्स वर अजून ही लस तयार होऊ शकली नाही.
एड्स , कोरोना वा अन्य रोग असो शारीरिक व मानसिक रोगप्रतिकारक शक्ती ही नेहमीच महत्वाची आहे. ही कोणत्याच औषधाने एका दिवसात वाढत नाही. म्हणून कोणत्याही औषधांची जाहिरात पाहून ते खरेदी करू नका.
जगातून लवकरच कोरोनाची समस्या संपेल परंतु एचआयव्ही, एड्स हा जगासमोरील ज्वलंत प्रश्न, न संपलेली व कधीही न संपणारी समस्या आहे. याचे कारण जगात वाढत चाललेला स्वैराचार.
डॉ. अंकुश जाधव
नवी मुंबई, इस्लामपूर (सांगली)
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)












Leave a Reply