Chinchwad news : अधिका-यांच्या बदल्या करा, माल कमवा एवढेच सरकारचे काम –  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Chinchwad news : अधिका-यांच्या बदल्या करा, माल कमवा एवढेच सरकारचे काम –  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

Pckhabar-राज्य सरकारचा एकच धंदा चालला आहे. अधिका-यांच्या बदल्या करा, माल कमवा या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही काम सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नसल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.  चिंचवड येथील  प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे आज (बुधवारी) झालेल्या मेळाव्याला महापौर उषा ढोरे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे,  विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे,  सभागृह नेते नामदेव ढाके, सदाशिव खाडे, एकनाथ पवार, राजेश पिल्ले, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, विलास मडीगेरी, बाबू नायर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, दलालांचा सुळसुळाट आहे. एका अधिका-याला चार-चार दलाल फोन करतात. आम्ही तुमची बदलून करुन देतो. आमचे जरा पक्के करा. दुसरा म्हणतो मी त्याहीपेक्षा तुमचे जास्त चांगल्या ठिकाणी करुन देतो. तुम्ही माझ्याशी पक्के करा. अशा प्रकारचे प्रशासन आणि अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्राने यापूर्वी कधीही पाहिली नाही. खूप मोठा असंतोष जनतेत तयार झाला आहे.

विजेच्या शॉक देणा-या सरकारला मतांचा शॉक देवून जागे करा!
कोरोना काळात भरमसाठ वीज बिले लोकांना आली. दोन खोल्यात राहणा-यांना 30 – 30 हजारांची बिल आले. महाराष्ट्राला न वापरलेल्या विजेची बिले दिली. त्यावर मंत्र्यांनी बिले सुधरुन देवू आणि बिलांमध्ये सवलत देखील देवू असे सांगितले. त्यानंतर तीन मंत्र्यांनी सांगितले. निर्णय झाला आहे. वीज बिलात सवलत देवू . आता राज्याचे उर्जामंत्री म्हणाले, वीज वापरलीय तर पैसे भरावे लागतील. कोणाला एक पैशाची देखील सवलत मिळणार नाही.

वापरलेल्या विजेचे पैसे निश्चित भरु पण तीन पटीपासून शंभरपटीपर्यंत बीले वाढीव लावली आहेत. वीज वापरलीच नाही. त्याची बिले कशी भरायची असा सवाल करत ते म्हणाले,  चार दिवसांपूर्वी मंत्र्यांनी सांगितले. हो घोषणा केली होती. पण, माझा अभ्यास झाला नव्हता. हा कोणता अभ्यास करतात ते समजत नाही. विजेच्या शॉक देणा-या सरकारला मतांचा शॉक देवून जागे करा, असेही ते म्हणाले.

बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/

(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *