Pcmc news: बांधकाम परवानागी देण्याचे अधिकार क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बहाल!
Pckhabar- चार हजार चौरस मीटरपर्यंत बांधकाम करायचे असेल. तर, नागरिकांना आता परवानगीसाठी महापालिकेत चकरा मारण्याची गरज नाही. कारण, पिंपरी-चिंचवड शहरात चार हजार चौरस मीटर पर्यंतची घरे बांधण्याची परवानगी आता महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी देणार आहेत. त्यामुळे जवळच्या प्रभागातच परवानगी मिळणार आहे.
बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार महापालिकेच्या तांत्रिक विभागाकडे होते. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यामध्ये बदल केला आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांना चार हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार बहाल केले आहेत. महापालिकेत आठ क्षेत्रिय कार्यालये असून पहिल्यांदाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांची ‘पॉवर’ वाढली आहे. तसेच चार हजार चौरस मीटर पर्यंतची बेकायदा बांधकामे पाडणे, अतिक्रमण निर्मूलनाची जबाबदारीही क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर असणार आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी बांधकाम परवानगी व अनधिकृत नियंत्रण विभागाकडील संबंधित नियंत्रित अभियंता यांच्यासह समनव्याने व एकत्रितपणे कामे करायची आहेत.
महापालिका चार प्रभागाचा एक असे दोन परिमंडळ करणार आहे. 4001 ते 20 हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकार उपायुक्तांना असणार आहेत. तर, 20 हजार चौरस मीटर पुढील बांधकामांना परवानगी देण्याचे अधिकार प्रभारी अतिरिक्त आयुक्तांना असणार आहेत. परिमंडळ कार्यान्वित होत नाही तोपर्यंत 4001 ते 20 हजार चौरस मीटरपर्यंतच्या बांधकाम परवानगीचे अधिकारही अतिरिक्त आयुक्तांकडेच असणार आहेत. अनधिकृत बांधकाम नियमित करण्यासाठी बांधकाम चालू करण्याचा दाखला देणे, जोते तपासणी, बांधकाम परवानगी मुदतवाढ व ना-हरकत दाखला देणे, भोगवटापत्रक देणे इत्यादी विषयक कामकाज तसेच घर दुरुस्ती परवानगी देणे इत्यादी प्रकरणी कारवाई करण्याचे अधिकार असणार आहेत.










Leave a Reply