Pckhabar-सामाजिक बांधिलकी जोपासत सांगवी परिसरात माहेश्वरी समाजाने महेश मंडळ ’संपर्क वाढवा संघटन वाढवा’ या उद्देशाने गेल्या 13 वर्षांपासून कार्यरत आहे. मंडळाने पुणे जिल्ह्याच्या माहेश्वरी समाजात आपल्या सामाजिक व विधायक कामामुळे महत्वाची भूमिका बजावली आहे. सांगवी परिसर महेश मंडळ हे पुणे जिल्हा माहेश्वरी समाजाबरोबर व देशात अखिल भारतीय माहेश्वरी समाजाबरोबर जोडले गेलेले आहे. संस्थेच्या सर्व सभासदांमुळे संस्थेची प्रगती होत असल्याच्या भावना सभासद व्यक्त करत आहेत. मंडळामार्फत वर्षभरात विविध स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतात.
सांगवी हा भाग पुणे शहर व पिंपरी-चिंचवड शहर यांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे. सांगवी येथे पुण्यामध्ये, हिंजवडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी व्यवसाय व नोकरी करणारे राहतात. मुळातच अल्पसंख्याक असलेल्या माहेश्वरी समाजाची अंदाजे 300 हुन अधिक कुटुंबे सांगवी परिसरात आहे. या ठिकाणी विशेषतः पुणे तसेच महाराष्ट्राबाहेरून नोकरी व्यवसायानिमित्त स्थलांतरित केलेल्या माहेश्वरी बांधवाना सामाजिक, सांस्कृतिक आधाराची गरज भासत होती. यासाठी सांगवी येथे काही ज्येेष्ठ व तरुण समाज बांधवानी एकत्र येऊन सांगवी परिसर महेश मंडळ या संस्थेची स्थापना 13 वर्षांपुर्वी केली.
संस्थेचे सभासद होण्यासाठी मंडळाकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. सर्व समाजबांधवांनी एकत्र यावे हि मंडळाच्या पदाधिकर्यांची इच्छा आहे. गेल्या दहा वर्षात संस्थेने आपली संस्कृती जतन करताना इतर विधायक कार्यक्रमाचे आयोजन केले. संस्थेच्या विधायक कार्यक्रमामुळे इतर समाज सुद्धा संस्थेशी जोडला गेला आहे. संस्थेमार्फत सांस्कृतिक कार्यक्रमात अन्नकूट, महेश नवमी तर विधायक कार्यक्रमात विविध आरोग्य शिबिर, रक्तदान शिबीर, शैक्षणिक मदत, विविध प्रकारचे मार्गदर्शनपर शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. गणगौर व तीज या दोन सणांचे माहेश्वरी समाजात असलेले अनन्यसाधारण महत्वाचे कार्यक्रम महिलांमार्फत आयोजित केले जातात.

संस्थेमार्फत दरवर्षी छोट्या शिशुसाठी सुदृढ बालक, महिलांसाठी रांगोळी, मेहेंदी, सलाड डेकोरेशन, मुलांसाठी चित्रकला, सुंदरलेखन, फॅन्सी ड्रेस, नृत्य स्पर्धा, सर्वासाठी बुद्धिबळ, सामान्य ज्ञान आदी स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
विधायक कार्यात आतापर्यंत खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉक्टर वैभव लुंकड यांचा सासू-सुनेच्या संबंधावर आधारित तणावमुक्त करणारा समाज प्रबोधन व्याख्यान कार्यक्रम, अंजली तापडिया यांचा आनंदी जीवन या वर आधारित व्याख्यान, सात आठ वर्षांपूर्वी दररोज घडणार्या आत्महत्या रोखण्यासाठी चैतन्य हास्ययोग मंडळाचे डॉक्टर विठ्ठल काटे व मकरंद टिल्लू यांचा ताणतणाव मुक्तीसाठी व्याख्यानाचे आयोजन.

रक्ताची मागणी व त्याचा तुटवडा भागवण्यासाठी वर्षातून दोन वेळा असे 21 रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 2700 हुन अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या गेल्या. 19 हुन अधिक आरोग्यशिबिरातून दंतचिकित्सा, हिमग्लोबिन, रक्तशर्करा, रक्तगट तपासणी, हाडांची ठिसूळता, मोफत टायफाईड लसीकरण, नेत्रतपासणी, हृदयरोग तपासणी नागरिकांसाठी घेण्यात आली. संस्थेतर्फे आतापर्यंत बर्याच गरजू रुग्णांना वेळेवर व मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आले.
संस्थेकडून रक्तदान व आरोग्यविषयक भरीव कामामुळे संस्थेला दौंड येथील रोहिणी जाधव स्मारक ट्रस्ट तर्फे देण्यात येणारा ’रक्तमित्र पूरस्कार’ आमदार राहुल कुल यांच्या हस्ते संस्थेला 2018 मध्ये देण्यात आला. आता पर्यंत 2000 हुन अधिक गरजू व हुशार विद्यार्थ्यांना संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. संस्थेमार्फत आतापर्यंत सांगवी येथील दोन व चाकण येथील एक अश्या मराठी माध्यमांच्या शाळेत आजच्या संगणक युगात विद्यार्थ्यांना वाचनासाठी व वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथालय साहित्य व पुस्तकांची मदत करण्यात आली.

संगणक युगात मराठी माध्यमाची मुले शिक्षणात मागे राहू नये या साठी दोन मराठी माध्यमाच्या शाळेत डिजिटल वर्ग (इ लर्निंग) चालू करण्यात आले. फेब्रुवारी 2019 रोजी व्हेरिटास टेकनॉलॉजीच्या सहकार्याने सांगवी येथील मराठी प्राथमिक शाळा येथे 10 संगणक भेट देण्यात आले. तेथे माहेश्वरी संगणक कक्ष चालू करण्यात आले. मे 2019 अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे गावकर्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी माहेश्वरी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारून लोकार्पण करण्यात आले. अंदाजे 1200 गावकर्यांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली.
कोरोना सारख्या दुर्देवी आपत्तीमध्ये 600 हुन अधिक मध्यमवर्गीय गरीब कुटुंबियांना संस्थेतर्फे 15 दिवस पुरेल इतके किराणा वस्तूचे वाटप सांगवी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, काळेवाडी आदी भागात करण्यात आले. स्वामी विवेकानंद प्रशाला दापोडी येथे दोन स्वचलित सॅनिटायझर मशीन देण्यात आले. सांगवीतील मराठी शाळेत मुलांना रोजचे हरिपाठ, मनाचे श्लोक, सहजगती घेण्यासाठी मंडळामार्फत सर्व वर्गात ध्वनी यंत्रणा बसविण्यात आली. खाजगी शाळेतील 10 वी व 12 वी च्या 85 टक्य्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या हुशार विद्यार्थांसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शिष्यवृती मिळावी याबाबतचे निवेदन आमदार लक्ष्मण जगताप यांना संस्थेमार्फत 2012 मध्ये देण्यात आले. या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे सन 2014 मध्ये आमदार लक्ष्मण जगताप व आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नाने हि शिष्यवृत्ती महापालिकेकडून चालू करण्यात आली.
संस्थेला सर्व समाजाप्रती असलेल्या सामाजिक व विधायक कार्यामुळे आयकर विभागाकडून देणगीसाठी 80 जी प्रमाणपत्र मिळाले आहे. स्थानिक पातळीवर आमदार लक्ष्मण जगताप, महापौर माई ढोरे, नगरसेविका शारदा सोनावणे, नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, नवनाथ जगताप, अंबरनाथ कांबळे, शशिकांत कदम या नगरसेवकांच्या सहकार्यामुळे संस्थेकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर भगवान माहेश्वरी चौक असे नामकरण करण्यात आले. संस्थेला आतापर्यंत राम बांगड, हिरालाल मालू आदी मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले आहे.
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)










Leave a Reply