महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकणार : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विश्वास
एन.डी.ए.मध्ये येण्याच्या रामदास आठवले यांच्या वक्तव्याची उडवली खिल्ली
Pckhabar-महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून सरकारला कोणताही धोका नाही असे सांगत सरकार पाच वर्षे टिकेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला. कोरोनामुळे मृत्यू झालेले पंढरपुर
तालुक्यातील भोसे येथील राष्ट्रवादीचे दिवंगत नेते राजूबापू पाटील ,वारकरी संप्रदायाचे जेष्ठ संत रामदास महाराज कैकाडी,एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि २५ वर्षे आमदार असलेले दिवंगत नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या निवासस्थानी जाऊन पवार यांनी मंगळवारी तीनही कुटुंबीयांची भेट घेतली. या सांत्वनपर भेटी उरकल्यावर शरद पवार यांनी संजय राऊत- फडणवीस भेट, आरक्षण आणि दोन्ही छत्रपती,रामदास आठवले यांची एनडीए ऑफर,मंत्र्यांच्या बंगल्यांची वीज बिले तसेच सुशांतसिंह आत्महत्या सीबीआय प्रकरण आदी विषयांवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना कोणी गंभीरपणे घेत नाही. सभागृहात आणि सभागृहाबाहेरसुद्धा त्यांचा एकही आमदार अथवा खासदार नाही. तरीपरंतु ते सर्वांना मार्गदर्शन करत असतात अशा शब्दात पवारांनी आठवले यांची शरद पवारांनी एनडीएत सामील होण्याच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा राजकीय अर्थ काढण्याचे कोणतेही कारण नाही. राऊत यांनी यापूर्वी माझीसुद्धा मुलाखत घेतलेली होती असे सांगत पवारांनी चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय मुलाखतीच्या वक्तव्याचे खंडन केले.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी केंद्र सरकारने तपास सीबीआयकडे दिला . मात्र इतक्या दिवसात त्यांनी काय दिवे लावले असा सवाल शरद पवार यांनी केला . मुंबई पोलीस याचा तपास करीत होती. मात्र केंद्राला ते पसंत नव्हते, म्हणून त्यांनी दुसऱ्या एजन्सीला काम दिले. पण या प्रकरणात आत्महत्येचा विषय बाजूलाच राहिला असून लक्ष वळवण्यासाठी इतरचं गोष्टीचा तपास सुरु केल्याने सत्य बाहेर येईल का ? हाच प्रश्न निर्माण झाला आहे, असे शरद पवार म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकून आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा असा सल्लासुद्धा शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिला. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यभरात आंदोलने सुरु आहेत. राज्य आणि केंद्र सरकारकडे आरक्षण देण्याची मागणी केली जात आहे. आरक्षण देण्याची जबाबदारी हि केंद्र सरकारची आहे. दोन्ही खासदार हे भाजप पुरस्कृत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिफारशीनेच त्यांची राज्यसभेत निवड झाली आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आता या दोघांनीच पुढाकार घ्यावा असे पवार म्हणाले.
कृषी विधेयकाबाबत बोलताना पवार म्हणाले,विधेयकाच्या विरोधात विविध राज्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करून शेतीमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने चालू ठेवले आहे. केंद्राने कांद्यावर घातलेली निर्यातबंदी उठावाने गरजेचे असल्याचे सांगत शेती विधेयकामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.










Leave a Reply