Pimpri News : खर्च महापालिकेचा अन् प्रचार भाजप नगरसेवकांचा
शिवसेनेचे संतोष सौंदणकर यांचा आरोप
Pckhabar- कोविड 19 च्या जीवघेण्या संकटातून पिंपरी-चिंचवडकरांची सुटका करण्यासाठी राज्य सरकार माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. मात्र, सत्ताधारी भाजपसह इतर राजकीय पक्षांच्या नगरसेवकांकडून या अभियानाच्या आडून नगरसेवकांनी घरोघरी स्वतःचा प्रचार सुरू केला आहे. भाजप पक्षनेत्यांच्या प्रभागातच यासंबंधित सर्वाधिक तक्रारी आहेत. हा प्रकार त्वरित थांबविण्यात यावा, अन्यथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे तक्रार करण्याचा इशारा शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत महापालिकेचे स्वयंसेवक 15 सप्टेंबरपासून घरोघरी भेटी देत आहेत. प्रत्येक नगरसेवकांवर स्वयंसेवक नेमून हे काम करवून घेण्याची जबाबदारी दिली आहे. मात्र, काही नगरसेवक या अभियानाचा गैरफायदा घेऊन घराघरात त्यांच्या नावाचा जय जयकार करवून घेत असल्याचा आरोप संतोष सौंदणकर यांनी केला आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे पक्षनेते यांच्या प्रभागातच स्वयंसेवक त्यांचे नाव घरोघरी सांगत असल्याच्या तक्रारी आहेत. राज्य सरकारच्या अभियानाच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करणे म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार’, असाच प्रकार असल्याची टीका सौंदणकर यांनी केली आहे.
या मोहिमेअंतर्गत स्वयंसेवकांवर संबंधित प्रभागातील नगरसेवकांचे नाव सांगण्याची सक्ती केली जात आहेत. यामुळे अभियानाचा हेतू बाजूला राहून नगरसेवकांच्या नावाचा प्रचार जोमात सुरू आहे. स्वयंसेवकांना जर पालिका मानधन देत असेल तर स्वयंसेवकांमार्फत नगरसेवकांचा प्रचार करून अभियानाच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी या अभियानाचा गैरउपयोग केला जात आहे, अशी तक्रार सौंदणकर यांनी प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
Pimpri News : खर्च महापालिकेचा अन् प्रचार भाजप नगरसेवकांचा










Leave a Reply