Article: कोविड-१९ मधील शिक्षण; शाळा बंद पण शिक्षण सुरू!
प्रा.सौ.पाटील माधुरी सचिन
जिजामाता ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा
Pckhabar-कोविड19 च्या महामारीमुळे अख्या जगावर मोठं संकट उभे राहिले आहे, त्यामुळे राष्ट्रांची अर्थव्यवस्था पुरतीच ढासळलेली दिसून येत आहे. प्रत्येक क्षेत्रात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. व्यापार,उद्योग, व्यवसाय ही क्षेत्रेही संभ्रमावस्थेतच प्रवास करीत आहेत. प्रत्येक जण स्वतःला जसे वाटेल तसा अर्थ घेऊन काम करत आहे. आता यात सर्वात मोठी जबाबदारी ज्या क्षेत्रावर असते ते म्हणजे शिक्षण… आणि हे शिक्षण क्षेत्रसुद्धा संभ्रमावस्थेत आहे. कोविड 19 मुळे शिक्षण बंद की काय?असे प्रश्न पालकांना, विद्यार्थ्यांना भेडसावू लागले. आणि एव्हढ्यात हे भेडसावणारे कोडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अलगद सोडवले गेले की आणखी किचकट होत गेले हे समजणे दुरापास्तच आहे. पण असो, या ना त्या मार्गे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणे गरजेचे होते. त्यामुळे सध्यातरी सर्व शिक्षक आणि शिक्षण संस्थानी ‘ऑनलाईन टिचिंग ‘ हाच पर्याय निवडला व त्याच्या माध्यमातून शिक्षण सुरू झाले आणि यातूनच ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू’ ही संकल्पना नव्याने रुजू झाली.
माझ्या मते ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न राहता तो ज्ञानार्थी बनतो आहे आणि तेही स्वयंप्रेरणेने. ऑनलाईन टिचिंगचा पर्याय अनिवार्य झाल्यासारखाच आहे त्यामुळे मोबाईल, टॅब, कॉम्पुटर, अशा सारख्या तंत्रज्ञानाच्या वस्तू विद्यार्थी अगदी सुलभपणे हाताळू लागला आहे ही एक आपली जमेचीच बाजू आहे. ज्या गोष्टी शिकण्यासाठी पैसे देऊन क्लासेस लावले जात होते ते आता अगदी हव्या त्या वेळी,हव्या त्या ठिकाणी, अगदी अल्प खर्चात मिळत आहे. त्यामुळे विद्यार्थीही गुंतून पडलेले आपल्याला दिसत आहे.
आता हेच ऑनलाईन शिक्षण के.जी टू पी.जी च्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत असल्यामुळे अगदी के.जी चा विद्यार्थी म्हणजे पूर्व प्राथमिक शाळेत विद्यार्थी देखील झूम, गुगल क्लासरूम, जिओ चॅट, व्हाट्सअप, स्काइप किंवाऑफलाईन व्हिडीओ स्वतःच्या स्वतःच अटेंड करू लागले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना कौशल्यधारीत ज्ञान प्राप्त होत आहे. पूर्वी एखादाच विद्यार्थी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेताना दिसायचा परंतु कोविड 19 मुळे सर्वच विद्यार्थी तंत्रस्नेही झालेले आहेत. यामध्ये विद्यार्थी व्हिडीओ निर्मिती करणे,पावर पोंईंट मध्ये काम करणे, यु ट्यूब चॅनल किंवा aap तयार करणे या सर्व गोष्टी स्वयंप्रेरणेने शिकू लागले आहेत एव्हढेच नव्हे तर परीक्षाही ऑनलाईन देवू करताना दिसताहेत. त्यामुळे पुढील आगामी काळात आपला देश अगदी शिक्षणाच्या बाबतीत प्रगत राष्ट्रांच्या यादीत असेल यात काही शंका नाही.
दूरदर्शन, आकाशवाणी व प्रसारमाध्यमांमुळे आजचा विद्यार्थी बहुश्रुत विचार करावा अशी संधी ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना मिळाली आहे. सर्वांना मोफत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे पण आपली ही जबाबदारी सरकार न पार पाडत आहेत का? ज्या प्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात तसेच या ऑनलाईन शिक्षणालाही दोन बाजू आहेत असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण ऑनलाईन शिक्षणाची दुसरी बाजु समजून घेताना आपल्याला आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पालकांचा व त्यांच्या पाल्याचा विचार करावा लागत आहे.कारण 30 ते 40 टक्के विद्यार्थ्यांकडे मोबाईल सेवा नसल्याने त्या विद्यार्थ्यांवर ऑनलाईन शिक्षणाचा होणारा अन्यायच म्हणावा लागेल आणि असे पालक आपल्या मुलांचे शिक्षण घडत नाही म्हणून अस्वस्थ आहेत तर दुसरीकडे त्यांचे शिक्षक विद्यार्थ्यांच्याशी संपर्क होत नाही म्हणून अस्वस्थ आहेत. यासाठीच आज शासन, पालक ,शाळा आणि शिक्षण या सर्वांनी एकत्रित येऊन एका प्रॅक्टिकल विचाराने काम करणे गरजेचे आहे.
परवाच व्हाट्सअप पाहत असताना ऊंनीस बिस मधला फरक 19 मध्ये ठेव तो मोबाईल… आणि बस अभ्यासाला असे तर 20 मध्ये घे हा मोबाईल …आणि बस अभ्यासाला. थोड्यावेळापूरते हसू आले परंतु नंतर विचार करायला लावणारा होता तो विनोद. दोन्हीही वर्षी तेच पालक, तेच विद्यार्थी, आणि तेच शिक्षक तरीही विचारांची भिन्नता क्षणार्धात बदललेली. यावरूनच शिक्षण ही काळाची गरज जरी असली तेही शिक्षण देणारी माध्यमे ही काळाप्रमाणे बदलनेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे भारत डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात आपलं स्थान मजबूत करेल आणि माजी दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत खऱ्या अर्थाने डिजिटल होईल यात तीळभरही शंका नाही.
“अशी आमुची शाळा आहे
ऑनलाईन शिक्षणाचा मेळा,
शिस्त नाही, धाक नाही समोर आहे डिजिटलचाच फळा” अश्या प्रकारे कोविड 19 मधील शाळा बंद पण शिक्षण सुरू ही संकल्पना रुजते आहे .










Leave a Reply