महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Pckhabar-जागतिक पर्यटन दिनानिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गंगापूर धरण परिसरातील (जि. नाशिक) ‘एमटीडीसी ग्रेप पार्क रिसॉर्ट’ आणि बोट क्लबचे तसेच खारघर (नवी मुंबई) येथील ‘एमटीडीसी रेसिडन्सी’ या पर्यटक संकुलाचे ई-उद्घाटन करण्यात आले. तसेच राज्यातील पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्रे, कृषी पर्यटन, युनेस्को जागतिक वारसास्थळे, राज्यातील विमानतळे, महामार्ग, महत्त्वाचे हॉटेल्स, रिसॉर्टस्, न्याहरी-निवास, जिल्हा पर्यटन आदींची माहिती देणाऱ्या ‘महाराष्ट्र टुरीजम- समथिंग फॉर एव्हरीवन’ या महाराष्ट्र पर्यटन डेटा बँक पुस्तकाचे यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन संचालक दिलीप गावडे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर आदी मान्यवर उपस्थित होते. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कुमारी आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे आदी मान्यवर ऑनलाईन सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यावेळी म्हणाले, पूर्वी एरियल फोटोग्राफी करत असताना संपूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. राज्याचे सौंदर्य आणि वैभव डोळ्यात मावत नाही. हे वैभव जगापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. राज्यातील फक्त पर्यटनस्थळांचा विकास करुन चालणार नाही. तिथे जायचे कसे, राहायचे कुठे, जवळची रेल्वे स्थानके, विमानतळ, त्या पर्यटनस्थळास भेट देण्याचा योग्य काळ कोणता आदी इत्यंभूत माहिती आणि सोयी-सुविधा आपल्याला पर्यटकांसाठी उपलब्ध कराव्या लागतील. आमच्या शासनाने कामकाज सुरु केल्यानंतर लगेच रायगडच्या विकासासाठी 600 कोटी रुपयांचा निधी दिला. कोकणातील चिपी विमानतळही आता लवकरच सुरु होत आहे. गुंफा, गडकिल्ले, वन्यप्राणी, वाघ, समुद्रकिनारे, जंगले हे राज्याचे वैभव आहे. हे वैभव जगापर्यंत पोहोचवून महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे पर्यटन राज्य बनवू, असे ते म्हणाले.
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक देशाचे पर्यटन हे मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. युरोपियन देश, अमेरिका आदी देशांना दरवर्षी सुमारे 8 कोटी पर्यटक भेट देतात. आपल्या राज्यातही पर्यटन क्षेत्रात असाच वाव आहे. मराठवाड्यात कृषी पर्यटन, विदर्भातील जंगल, कोकणातील समुद्र किनारे यांची माहिती पर्यटकांना देता येईल. पर्यटनातून रोजगार निर्मिती बरोबरच राज्याला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळे राज्याच्या पर्यटन विकासास चालना देण्यात येईल, असे ते म्हणाले.










Leave a Reply