Article : कोविड-१९ निर्मूलनात ॲलोपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांना सामावून घ्या : डॉ. अंकुश जाधव

Article : कोविड-१९निर्मूलनात ॲलोपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांना सामावून घ्या : डॉ. अंकुश जाधव
Pckhabar- चार लॉकडाउन संपून आता चौथा अनलॉक ही संपत आला आहे. परंतु कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच चालले आहे. कोरोना चाचण्याची संख्या जस जशी वाढत जाईल तस तसे कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत जाणार हे निश्चित.

कोरोना महामारीने आता शहारांपाठोपाठ ग्रामीण भागात ही हाहाकार माजविला आहे. मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहारांबरोबरच ग्रामीण भागात ही खाट(बेड) मिळणे अवघड, अडचणीचे झाले आहे. म्हणूनच आता सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना रुग्णांना या पुढे घरीच उपचाराखाली ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला इशारा दिला आहे की, चाचण्यांचे प्रमाण वाढवा. हे प्रमाण वाढविले नाही तर याचे गंभीर परिणाम होऊन रुग्ण व मृत्यूसंख्येत वाढ होईल. मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, कोल्हापूर, सांगली व नाशिक या जिल्ह्यात रुग्ण संख्येत मोठी वाढ होईल याचा अंदाज ही वर्तविला आहे. मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांच्या बरोबर झालेल्या चर्चेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यापैकी १२ जिल्ह्यात मृत्यू चे प्रमाण अधिक आहे, असे सांगितले आहे.
सरकारी यंत्रणा चांगले काम करीत असल्या तरी मर्यादा आहेत. सरकारी नियमांचे सर्वच पक्ष, अनेक संघटना अजिबात पालन न करता दररोज मोर्चे, धरणे आंदोलन, मंदिरे उघडा सारखी आंदोलने करीत आहेत व सोशल डीस्टन्स चे बारा वाजवीत आहेत. कोरोना संसर्ग वाढविण्यास मदतच करीत आहेत. कोरोना संसर्ग सरकारी आरोग्य यंत्रणेच्या हाताबाहेर जाऊ लागला आहे. “माझे कुटुंब, माझे जबाबदारी” ही मोहीम सध्या सर्वत्र राबविली जात आहे. यात सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक केली आहे. साहजिक प्रश्न पडतो की “माझे कुटुंब, माझी जबाबदारी “असेल तेथे शिक्षकांचे काय काम? हा प्रश्न त्यांची मुलेच त्यांना विचारत आहेत. त्यांना दिलेली थर्मल, ॲक्सिमिटर इ.साधने ही जास्त चांगल्या प्रकारची नाहीत.

आता तर काही राजकीय पक्षाचे नेते आपल्या फोटोसह कोरोनाची ट्रीटमेंट मोठं मोठया बॅनर वर लावत आहेत. म्हणजे ट्रीटमेंट काय आहे? हे सामान्यातल्या सामान्य माणसाला माहीत झाले आहे, मग ही ट्रीटमेंट योग्य ती काळजी घेऊन सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर का देऊ शकत नाहीत?येथे मला आठवण होते ती ३५/४० वर्षांपूर्वीची. मलेरिया वर उपयुक्त असणाऱ्या “क्लोरोक्वीन” या गोळ्या शाळातील मास्तरांकडे मिळत होत्या, त्या घ्यायची परवानगी आयुर्वेदिक डॉक्टरांना नव्हती. किती विचित्र? दुर्दैवाने आजही सरकारच्या मानसिकतेत फारसा फरक पडला नाही, असेच दिसत आहे.

कोरोनाच्या महासाथी चे संकट दूर करण्यासाठी डॉक्टर, पोलीस वा साधा सफाई कामगार, अन्य काम करणारे हे सर्वच”कोरोना यौध्दा”आहेत. कोरोनावर मात करायची असेल तर याचे लवकर निदान करणे व संसर्गग्रस्त व्यक्तीचा अन्य लोकांशी येणारा संपर्क तोडणे महत्त्वाचे आहे, जेणे करून ही साखळी तोडणे सोपे जाईल.
हे जर प्रभावीपणे करायचे असेल, संसर्गावर मात करायची असेल तर आपल्या आरोग्य व्यवस्थेचा पाया, कणा असलेल्या, आरोग्य व्यवस्थेत महत्वाची कामगिरी करणाऱ्या जनरल फिजिशियन, फॅमिली फिजिशियन यांची मदत या उपचार प्रक्रियेत घेणे, त्यांना सक्रिय सहाभागी करून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यांना सौम्य व मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांची ट्रीटमेंट करण्याची परवानगी द्यावी. या डॉक्टरांना आपल्याकडे येणाऱ्या रुग्णाच्या सर्व कुटुंबाची माहिती असते.

काही वर्षांपूर्वी आलेल्या स्वाईन फ्लू च्या साथीत अनेक लोकांनी नेहमीच्याच डॉक्टर कडे ट्रीटमेंट घेतली होती व आज ही अनेक लोक कोरोनासारखी लक्षणे दिसू लागताच नेहमीच्या डॉक्टर कडे ट्रीटमेंट घेत आहेत, बरेही होत आहेत. ही वस्तुस्थिती आहे व हे मान्य करणेच योग्य होईल.

“अन्य देशांप्रमाणे कोरोना विषाणू भारतात घातक नसून येणाऱ्या काळात कोरोना हा सामान्य फ्ल्यू सारखा होईल”असे आयसीएमआरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन चे संचालक डॉ.देवप्रसाद चटोपाध्याय यांनी मे महिन्यातच म्हटले आहे.

आयुर्वेदाला कोरोना च्या उपचारात डावलले जात आहे, ही जनसामान्य लोकां असलेली भावना दिवसेंदिवस दृढ होत आहे. अलोपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टर म्हणजे नियमित क्लिनिक चालविणारे वा सामान्य प्रॅक्टिस करणारे डॉक्टर हा अर्थ येथे अभिप्रेत आहे. जनरल फिजिशियन, फॅमिली फिजिशियन मध्ये ॲलोपॅथी व आयुर्वेदिक डॉक्टरांचा प्रामुख्याने समावेश होतो. आयुर्वेदीक डॉक्टरांना अॅलोपॅथीची औषधे वापरण्याची परवानगी आहे. ते अॅलोपॅथी औषधांबरोबर कोरोना वर उपयुक्त असणारी काही आयुर्वेदिक औषधें वापरून “संयुक्त उपचार” करू शकतील. परिणामी कोरोना बरा होण्याबरोबरच कोरोना नंतर चे जे दुष्परिणाम(post covid-19 complications) होतात ते निश्चितच आजच्या इतके होणार नाहीत. कोरोना बरा झाल्यानंतर जे दुष्परिणाम दिसून त्यावर परिणामकारक अशी खूप चांगली आयुर्वेदिक औषधे आहेत.

कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याला लगाम घालण्यासाठी सरकारने आता तरी सौम्य व मध्यम स्वरूपाच्या लक्षणांवर उपचार करण्याची परवानगी जनरल फिजिशियन व फॅमिली फिजिशियन द्यावी. कोरोना चे संकट दूर करण्यात सहभागी करून घ्यावे.
केंद्र व राज्य सरकारला हे ही योग्य वाटत नसेल तर या डॉक्टरांसाठी एखादी सामान्य, व्यावहारिक मार्गदर्शक तत्वे जारी करून परवानगी द्यावी.
डॉ. अंकुश जाधव
माजी सहायक संचालक (वैज्ञानिक-४), केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, आयुष मंत्रालय, भारत सरकार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *