Maval News : मावळात दररोज पाऊस, भात पीक जोमात
Pckhabar- दररोज पडत असलेल्या मान्सूनच्या जोरदार पावसाचा मावळ तालुक्यातील खरीप भात पिकास चांगला फायदा होत आहे. भात पीक निसण्यासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
सध्या मान्सूनचा परतीचा पाऊस मावळ तालुक्याच्या सर्वदूर अतिशय चांगला पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये मान्सून चांगला आणि समाधानकारक पाऊस पडल्यामुळे खरीप भातपीक सोयाबीन, भुईमूग तसेच इतर कडधान्य पिकांची जोमाने वाढ झालेली आहे.
यावर्षी लागवडीच्या काळात मान्सूनचा चांगला पाऊस पडल्याने खरीप भात पिकाच्या सुमारे 12 हजार 700 एकर क्षेत्रावर भात लागवड पूर्ण झालेल्या आहेत. भात पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात पावसाने चांगली हजेरी लावल्याने भात पीक जोमात आणि जोरात आलेले आहे. सध्या खरीप पिके दाणे भरण्याच्या अंतिम टप्प्यात असून या पावसाने भाताच्या लोंब्या निसावत आहे. सध्या पडत असलेले पावसाने दाणे चांगले भरतील, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे.
पूर्वभागातील सोयाबीन, भुईमूग आणि कडधान्ये ही पिके चांगली आलेली असून काढण्यासाठी ही पिके तयार झालेली आहे. मान्सूनच्या परतीचा पाऊस सध्या दररोज कोसळत असून रब्बीच्या पिकांना ही तो उपयुक्त आहे.










Leave a Reply