Article : आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी!

दिपज्योती यादव-पवार
Pckhabar- कोरोनाची महामारी जगात उत्पन्न होऊन जवळजवळ आता 8 ते 9 महिने उलटून गेले आहेत. परंतु या क्षणापर्यंत हा आजार नेमका कशामुळे पसरला आहे, याचा देखील शोध संशोधक लावू शकले नाहीत. की यावर कोणत्या प्रकारचे औषध येऊ शकले नाही. या महामारीमुळे होत असलेले नुकसान मग ते कोणत्याही प्रकारचे असेल ते फक्त हतबलपणे पाहत राहण्याशिवाय माणसाच्या हातामध्ये काहीच उरले नाही.

कोरोना हा विषाणू जर मानवनिर्मित असेल तर माणूस आपल्या स्वार्थासाठी किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो हे संपूर्ण जगाने बघितले आहे. एका देशाच्या आर्थिक महासत्ता होण्याच्या हव्यासापायी अनेक कुटुंब अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. या सगळ्या महामारीने माणूस आपल्या शुल्लक स्वप्नासाठी किती हीन दर्जाची मानसिकता जन्माला घालू शकतो, हे लक्षात येते. या महामारीने अनेक कुटुंबांनी आपल्या कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्ती गमावल्या आहेत. हे फक्त जगामध्ये आपली सत्ता निर्माण करण्यासाठीचा आटापिटा.

भारताच्या दृष्टीने या महामारीचा विचार केला तर भारत हा एक सांस्कृतिक, सण उत्सव साजरा केला जाणारा देश आहे. हे सण उत्सव म्हणजे भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहेत. परंतु या कोरोनाच्या महामारीने हे सण उत्सव साजरे करण्यावरच इतके प्रतिबंध आले आहेत की, कधी एकदा या सगळ्या संकटातून मुक्तता होईल असे वाटायला लागले आहे. हे सण उत्सव साजरे करण्याच्या पाठीमागे मुख्य हेतू हा असतो की, समाजातील लोक एकत्र येऊन समाजातील वातावरण स्थिर राहील ( आता देखील तोच हेतू आहे याबद्दल शंका मनात येते) परंतु तरी देखील या सण उत्सवांसाठी भारतातील अनेक जातींची, धर्माची, पंथाची लोक एकत्र येत असतात. त्यामुळे भारतातील एकतेचे दर्शन या सण उत्सवांमधून दिसून येते.

महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या राज्यामध्ये ऐतिहासिक वातावरण सोबतच धार्मिक देखील वातावरण आहे. महाराष्ट्रातील धार्मिक वातावरणाचा विचार केला तर पंढरपूरची वारी आणि गणेशोत्सव हे दोन्हीही उत्सव अतिशय उत्साहात साजरे केले जातात. पंढरपूरच्या वारीमध्ये संपूर्ण राज्यातून आणि शेजारील राज्यातून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येत असतात. हा महाराष्ट्रातील अलौकिक असा सोहळा आहे. परंतु यावर्षी कोरोना संकटामुळे सर्व संतांच्या पादुका एस. टी बसने नेण्याची वेळ आली. हा क्षण सर्वच वारकऱ्यांसाठी अतिशय वेदनादायी होता. अशी वेळ महाराष्ट्रावर पुन्हा येऊ नये असे वाटते. त्यानंतर साजरा झालेला गणेशोत्सव देखील लोकांनी उत्साहात परंतु भीतीच्या सावटाखाली साजरा केला.
कोरोनाच्या महामारीचा प्रभाव अगदी श्रीमंतातील श्रीमंत आणि गरीबातील गरीब लोकांवर पडला आहे. या महामारीने जगाला जवळजवळ पाच ते दहा वर्षे पाठीमागे नेले आहे. ही महामारी सुरू झाल्यापासून सर्व देशातील आरोग्य यंत्रणा अतिशय चिवटपणे या सगळ्यांशी झुंज देत आहे. सर्व संशोधक या विषाणुवर लस शोधण्यासाठी अक्षरशः रात्रीचा दिवस करत आहेत. तरी देखील या विषाणुवर कुठलीही लस उपलब्ध होत नाही. जगातील कुठल्याही व्यक्तीला अशा वातावरणामध्ये सुरक्षित वाटत नाही.
त्यामुळेच या सर्व परिस्थितीसमोर हात टेकल्यानंतर आपसूकच माणसाचे हात परमेश्वरासमोर जोडले जातात आणि म्हणतात आज आम्हावरी संकट भारी धावत ये लवकरी!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *